बाल मंदिर प्रशालेत संविधान दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम
परभणी,(प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्ती, समाज आणि देशाचा विकास करण्याची संधी व सामर्थ्य संविधानाने दिले आहे. संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाच्या प्रगतीचा, समानतेचा आणि स्वाभिमानाचा पाया आहे. संविधानाने प्रत्येकाला समान संधी, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुतेची मूल्ये प्रदान केली आहेत, असे प्रतिपादन मुंजाजी शेवाळे यांनी केले.
भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवार 26 नोव्हेंबर रोजी बाल विद्यामंदिर प्रशालेत संविधानातील मूल्यांचा जागर घडविणारा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देण्यात आली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अरुण बोराडे यांनी एका सुंदर कथेद्वारे संविधानाचे महत्त्व विशद केले. समानता, न्याय, अधिकार, कर्तव्ये आणि परस्पर आदर या संविधानातील मूल्यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले. संविधान हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला दिशा देणारे आणि समाजात एकता निर्माण करणारे प्रभावी माध्यम असल्याचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमास पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर आणि सीमा बोके यांची प्रमुख उपस्थिती होती. इयत्ता दहावी ‘ड’च्या विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सात विद्यार्थ्यांनी संविधान दिन, संविधान निर्मिती, मूलभूत अधिकार व कर्तव्ये, लोकशाही आणि संविधानाचे महत्त्व या विषयांवर अभ्यासपूर्ण भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषी सिद्ध आणि अक्षरा चव्हाण यांनी केले. वृंदावनी मगर हिने आभार प्रदर्शन केले.


