परभणी,(प्रतिनिधी) : साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून ग्रामजागराची प्रभावीपणे मांडणी करावी, असे आवाहन कवी इंद्रजित भालेराव यांनी केले.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि अरुणोदय बहुद्देशीय सेवाभावी संस्था, चाटोरी यांच्या संयुक्त विद्यमाने चाटोरीत (ता.पालम) शनिवारी (दि. 28) आयोजित केलेल्या दोन दिवशीय ग्रामजागर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष कृषीभूषण कांतराव देशमुख तर उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. दिनानाथ फुलवाडकर यांच्यासह आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, मुद्रांक जिल्हाधिकारी महेश वडदकर, रेखाताई गुट्टे, डॉ. राजेश गायकवाड, बा. बा. कोटंबे, डॉ. शिवाजी शिंदे, नरहरी ढगे, विजय ढाकणे, माणिक पुरी, माधव गव्हाणे, एकनाथ साळवे, भाऊसाहेब भोसले, गोविंद तुरनर, आयोजक प्रा. संदीप किरडे, सचिन जोशी, सुभाष ढगे, प्राचार्य डी. बी. पवार, अरुण चव्हाळ, बबन आव्हाड हे उपस्थित होते.
यावेळी भालेराव यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकडोजी महाराज यांच्यासह अन्य संत-महंत व महात्म्यांनी आपल्या आचरणातून आणि विचारातून ग्रामजागराची संकल्पना सातत्याने मांडली. साहित्यातूनसुध्दा ती उतरवली. तीच ग्रामजागराची परंपरा आताच्या साहित्यिकांनी प्रभावीपणे चालवली पाहिजे. गावखेड्यातील सर्वांगिण विकासासाठी आपल्या साहित्यातून त्याचे प्रतिबिंब उमटवले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
ग्रामीण भागातील पारंपरिक जागराचे महत्त्व आजही महत्वपूर्ण ठरणारे आहे. साहित्याच्या माध्यमातून होणारा नवजागर ग्रामीण विकासासाठी अनन्यसाधारण आहे, असे भालेराव यांनी नमूद केले. संत नामदेव, संत जनाबाई यांच्या कार्याचा गौरव करतेवेळी भालेराव यांनी ग्रामजागराच्या संकल्पनेत अनेकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ते प्रेरक आहे, असे स्पष्ट करीत वर्तमान व नव्या पिढीतील साहित्यिकांनी या विषयाकडे गांभीर्याने पहावे, असे ते म्हणाले.
उद्घाटकीय भाषणात प्राचार्य डॉ. दिनानाथ फुलवाडकर म्हणाले की, साहित्यनिर्मितीशिवाय समाजाचा विकास शक्य नाही. साहित्यिकांनी समाजातील प्रश्नांचे डोळसपणे चिंतन करून ते आपल्या साहित्यातून मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा. सुभाष ढगे आणि डॉ. श्रेया रसाळ-बोबडे संपादित ‘ग्रामजागर’स्मरणिका, डॉ. फुलवाडकर लिखित ‘आजीची आमराई’ हा काव्यसंग्रह तसेच वेदांत ढगे लिखित ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संमेलनाच्या प्रारंभी हभप अच्युत महाराज दस्तापुरकर, हभप मुंजाभाऊ लोहरेकर आणि रेखाताई गुट्टे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. मुद्रांक जिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन आणि पक्षी छायाचित्र दालनाचे उद्घाटन झाले. यावेळी उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. शिवाजी शिंदे आणि शिक्षक माधव गव्हाणे यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. राहुल पाटील, कांतराव देशमुख, डॉ. शिवाजी शिंदे आणि रेखाताई गुट्टे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयंत बोबडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सुभाष ढगे यांनी केले, तर प्राचार्य डी. बी. पवार यांनी आभार मानले. संमेलनाला साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Saturday, November 28
ताज्या बातम्या:
- भारस्वाडा जिल्हा परिषद शाळेला 101 पुस्तकांची भेट : एचएआरसीचा ‘आनंदी वाचनपेटी’ उपक्रम; हेमलता कोरवार यांचे प्रायोजकत्व
- साहित्यिकांनो, साहित्यातून ग्रामजागराचा ‘कल्लोळ’ करा – प्रा. इंद्रजित भालेराव यांचे आवाहन : चाटोरीतील ग्रामजागर साहित्य संमेलनाचे उद्घाटन जल्लोषात
- 17 महसूल मंडळातील शेतकरी पीकविम्याच्या प्रतिक्षेत : पीक विमा कंपनीच्या आक्षेपावर सुनावनी प्रलंबित
- परभणीत २९ नोव्हेंबरला कृषी पदवीधरांसाठी ‘महा मेगा भरती;पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळावा
- पालम येथे ‘शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबिर’ उत्साहात संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- लाचखोर डेप्टी सीईओसह कर्मचार्यास व्हीआयपी ट्रिटमेंट : पोलीस कोठडी ऐवजी आरोपींचा आयसीयुमध्ये आराम
- उद्या परभणीत राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा : जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनद्वारे स्पर्धांचे आयोजन
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्शीकर यांच्यासह कर्मचार्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी : लाच स्विकारल्याचे प्रकरण


