परभणी (प्रतिनिधी) : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या विविध विषयांवरील दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांच्या हस्ते या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात 200 पेक्षा अधिक दिवाळी अंक वाचण्यास मिळणार आहेत.
याप्रसंगी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा कोषागार अधिकारी श्री. पाचंगे व प्रमुख पाहुणे केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य राहूल नितनवरे यांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या सर्व समावेशक दिवाळी अंकाचे अवलोकन केले व ग्रंथालयाने वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या 200 दिवाळी अंकांचा वाचनप्रेमींनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले.
प्रदर्शन दि. 14 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत वाचक, अभ्यागंत, साहित्यिक व संशोधकांसाठी शासकीय सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत खुले असणार आहे.
प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने विनोदी साहित्य, आरोग्य, कृषी, समाजशास्त्र, पर्यटन, विज्ञान, तंत्रज्ञान, पाककला, ज्योतिष शास्त्र, थरार कथा, महिलांसाठी व बाल वाचकांसाठी उपयुक्त अशा विविध विषयांवर महाराष्ट्रातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिवाळी अंकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे यांनी दिली.



