परभणी (प्रतिनिधी) मतदानाची तारीख निकट येत असतानाच निवडणूक प्रचाराला आता वेग आला असून कॉर्नर बैठका मेळावे या सर्वांच्या माध्यमातून आ. डॉ. राहुल पाटील हे मतदारांशी संवाद साधत असून या मेळावा कॉर्नर बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे
परभणी शहरातील विविध भागात महाविकास आघाडीच्या वतीने तथा शिवसेना उबाठा गटाच्या वतीने उमेदवार तथा आ. डॉ. राहुल पाटील यांच्या प्रचारानिमित्त कॉर्नर बैठका, मेळावे आयोजित केले जात आहेत. या द्वारे ठिकठिकाणी मतदारांच्या सोबत संवाद साधला जात आहे. शहरातील जुना पेडगाव येथील वैभव नगर येथे बोलताना डॉ. राहुल पाटील म्हणाले की सध्याच्या सरकारने फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी विविध योजना राबवल्या मात्र जनतेचे मूळ प्रश्न यावेळी त्यांना बगल देण्यात आली आमचे सरकार हे जनतेच्या पाठीशी उभा राहणारे सरकार असून जनतेचे सर्व कामे मार्गी लावण्यासाठी मी कटीबद्ध आहे. हे सरकार सर्वसामान्यांच्या मनातून केव्हाच गेले आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार निश्चितच येणार आहे. शहरातील असो की ग्रामीण भागातील मतदार आता सुजान झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येने महाविकास आघाडी व शिवसेना उबाठा गटाच्या सोबत राहतील असा विश्वास डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केला.
तसेच अनेक प्रभागांमध्ये तसेच वसाहतीतून महिला मतदारांच्या बैठका आ. डॉ.राहुल पाटील यांच्या पत्नी डॉ. संप्रिया पाटील, शिवसेना विधानसभा संघटक अंबिका डहाळे या घेत आहेत. या बैठकांना सुद्धा महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आ. डॉ. राहुल पाटील यांच्याकडून झालेल्या विकास कामांची आणि शहरातील मतदारसंघातील निर्माण केलेल्या व्हिजनला मतदारांसमोर मांडले जात आहे. मागील निवडणुकीपेक्षा त्या निवडणुकीत अधिकाधिक मतांनी डॉक्टर राहुल पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन या महिला मेळाव्यातून केले जात आहे


