परभणी (प्रतिनिधी)शहरातील व्यापाऱ्यांसाठी आ.राहुल पाटील यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे, शासनाकडे पाठपुरावा केला. शहरातील व्यापारी बांधवांच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी आ. डॉ.राहुल पाटील यांनी कायम सहकार्य केले.त्यामुळे व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांना भक्कम पाठिंबा देत असल्याचे महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी आज मेळाव्यात बोलताना जाहीर केले.
महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आ. डॉ.राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतर्फे संवाद मेळाव्याचे आयोजन अक्षदा मंगल कार्यालयात गुरुवारी (दि.14) सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, आ.डॉ. राहुल पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आ. सुरेश देशमुख, माजी आ.विजय गव्हाणे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, मानवी हक्क अभियानाचे मिलिंद आव्हाड, ज्येष्ठ विधीज्ञ अशोक सोनी, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिन आंबिलवादे, तुकाराम साठे, डॉ. राजू सुरवसे उपस्थित होते. यावेळी माजी खा. तुकाराम रेंगे, माजी आ. विजय गव्हाणे, मानवी हक्क अभियानचे मिलिंद आव्हाड यांनी संबाेधित केले.
तर पत्रकार अशोक वानखेडे म्हणाले की, 50 खोक्यासाठी काहींनी आपला आत्मसन्मान विकला, जनतेचा अपमान केला, त्यामुळे पुन्हा या सरकारला थारा देऊ नका, महाविकास आघाडीला सत्तेत आणा. तर माजी आ सुरेश देशमुख म्हणाले, परभणी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी तसेच डॉक्टर्स, वकील अशा तज्ज्ञ मंडळींचा मोठा वाटा असणे आवश्यक आहे. त्यांनी सुद्द्धा आ. राहुल पाटील यांना विजयी करावे, असे आवाहन संवाद मेळाव्यात माजी आ. सुरेश देशमुख यांनी केले. परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांच्या पाठीशी जिल्ह्यातील व्यापारी, मतदारांनी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. (छाया उत्तम बोरसुरीकर)



