अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा
परभणी,(प्रतिनिधी) अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन हे अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना राबवित आहे. याचा सर्व अल्पसंख्यांक समाजातील वंचित घटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी यावेळी केले.
संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रस्तूत केला होता. त्याकरिता दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय अल्पसंख्यांक दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच अल्पसंख्यांक समाजास त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती व्हावी याकरिता अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. काळे बोलत होते. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी बालासाहेब चौलवार यांच्यासह शिक्षक, मार्गदर्शक आणि अल्पसंख्यांक समाजातील नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. काळे यांनी अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, अभ्यासिका यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढे यावे व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे लोककल्याणकारी काम करावे, असे आवाहन केले. तसेच त्यांनी अल्पसंख्यांकासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना प्रमाणपत्रांचे डॉ. काळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
प्रास्ताविकात सहायक जिल्हा नियोजन अधिकारी बालासाहेब चौलवार यांनी जिल्ह्यात अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा नियोजन कार्यालयातील सहायक संशोधन अधिकारी उमाकांत लोखंडे, धम्मपाल कांबळे, बालासाहेब भिसे, सांख्यिकी सहायक संजय भोसले यांच्यासह शिक्षक, मार्गदर्शक आणि अल्पसंख्यांक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



