परभणी,(प्रतिनिधी) केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या बहुउद्देशीय प्राथमिक सहकारी संस्थांच्या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावर व्हि.सी.द्वारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
परभणी जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव व पदाधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपूडकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कुरुंदकर, नाबार्ड जिल्हा विकास अधिकारी एस.के.नवसारे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक उदय कुलकर्णी, जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक व त्यांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सहकार विभागाशी संबंधित केंद्रिय योजनांशी संबंधित विविध समित्यांचे सदस्य व त्यांचे प्रतिनिधी, सहकार विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रत्येक गावांमध्ये एक बहुद्देशीय सहकारी संस्था नव्याने नोंदणी करुन सहकारातून सभासदांचे, शेतक-यांचे विविध केंद्रिय योजनेच्या माध्यमातून हित साधण्याचे काम ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत होणार असल्याचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी सांगितले. पूर्णा तालुक्यातील कावलगाव जुनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने केंद्रिय योजनेच्या माध्यमातून सुरु केलेल्या (जन औषधी) उपक्रमांची यशोगाथा पीपीटीद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव व अध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी सर्व गटसचिव व उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच केंद्रिय योजनांचे मार्गदर्शन व सहकार गॅलरीची उभारणी संदर्भात पीपीटीद्वारे एम.ए.भोसले, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सहाय्यक निबंधक (प्रशासन) यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा यांचे अध्यक्षतेखाली थेट प्रेक्षपणाद्वारे दूरचित्रवाणी परिषदेचा समारोप करण्यात आला.
*-*-*-*-*


