परभणी,(प्रतिनिधी) : मस्सजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणार्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवारी (दि.4) परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालया पासून हा मोर्चा निघणार असून महाराणा प्रताप चौक -शनी मंदिर – नानल पेठ कॉर्नर- छत्रपती शिवाजी चौक- गांधी पार्क- नारायण चाळमार्गे महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात स्व.संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, ज्योतीताई मेटे व स्थानिक परभणी जिल्हा प्रतिनिधी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.
स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या सुरुवातीला सर्वांनी स्व.देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बीड जिल्ह्यातील आपल्या बांधवाला न्याय देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी, दहशत व जातीयवाद मोडीत काढण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुक मोर्चात परभणी जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व जाती-धर्मातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व पक्ष संघटना, मित्र मंडळ, सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.


