परभणी,(प्रतिनिधी) : सहावा वेतन आयोग लागू करावा यासह रखडलेल्या अन्य मागण्यांकरीता परभणी व हिंगोली जिल्हा गटसचिव कर्मचारी संघटनेच्या संतप्त सदस्यांनी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात 6 जानेवारीपासून धरणे व बेमुदत आंदोलन सुरु केले असून मंगळवार 14 जानेवारी रोजी म्हणजे आठव्या दिवशीही हे आंदोलन सुरुच आहे.
संगणकीकरण संस्थांना लागणारा खर्च, विद्युत बिल, वायफाय कनेक्शन, रिचार्ज, टेबल-खूर्ची व अन्य खर्च गट सचिवांना मिळणार्या 17 ते 22 हजार पर्यंतच्या वेतनातून भागत नाही, त्यामुळे संगणीकरण संस्थांना कामकाजाबाबत वार्षिक खर्चाची तरतूद करुन प्रत्येक महिन्याला सदचा खर्च देण्याचे प्रयोजन करावे, सचिवांना लातूर पॅटर्नप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, 2023 ला ताळमेळ केलेल्या संस्थेला देवू केलेल्या खर्चासाठी परसंस्था पाच हजार रुपयांची रक्कम तात्काळ वितरित करावी, थकीत वेतनही वितरित करावे, जीडीसी अॅन्ड ए परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सचिवांनाही जून्या सचिवांप्रमाणे न्याय द्यावा, वेतनवाढ करावी, नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे वेतन तात्काळ काढावेत, दर सहा महिन्याला महागाई भत्त्यात शासन निर्देशाप्रमाणे वाढ करावी, या मागण्यांसाठी जिल्ह्यातील गटसचिवांनी हे आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल, असा निर्णयही या आंदोलनकर्त्यांनी जाहीर केला आहे.


