चैतन्य प्रतिष्ठान परभणीच्यावतीने आयोजन
परभणी,(प्रतिनिधी) : शहरातील नांदखेडा रोडवरील वैष्णवी मंगल कार्यालयात रविवार 26 जानेवारी ते मंगळवार 28 जानेवारी दरम्यान सांयकाळी सहा ते आठ या दरम्यान चैतन्य प्रतिष्ठान परभणी आयोजित श्रीमद्भगवतगीता भावदर्शन या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आल्याचे चैतन्य प्रतिष्ठानतर्फे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे होणार्या श्रीमद्भगवतगीतेवरील प्रवचनमालेसाठी यंदाच्या वर्षी गीतेच्या ज्ञानविज्ञानयोग या सातव्या अध्यायावर श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर, पंढरपुर यांचे निरुपण होणार आहे.
कोविडच्या काळातील एक वर्ष वगळता मागील आठ वर्षांपासून अव्याहत चालू असणार्या या प्रवचनमालेत श्रीमद्भगवतगीतेच्या एक एका अध्यायाचे निरुपण प्रतिवर्षी करण्यात येत असते. प्रथमवर्षी संपूर्ण गीतेचे भावदर्शन झालेल्या या प्रवचनमालेच्या आयोजनासाठी परभणी शहरातील अनेक ज्येष्ठ नागरीकांनी त्रिंबकराव सुगावकर यांच्या नेतृत्वात एकत्र येवून चैतन्य प्रतिष्ठानची स्थापना केली. त्यानंतर वि.म. औंढेकर, बंडू नाना सराफ, सुहास बीडकर, अशोक सेलगावकर, प्रभाकर देशमुख, शंकर आजेगावकर, आनंद देशमुख, श्रीपाद देशपांडे, विश्राम परळीकर, माऊली साडेगावकर, गिरीश कर्हाडे, नंदकुमार कौसडीकर, शिवाजी गुंजकर, तुळजादास बोराळकर, विजय पिंगळे, शिवाजी वांगे, एकनाथ वट्टमवार, शंकर गुंडलवार, सुधाकर लंघर, अॅड.किरण दैठणकर, श्रीकांत देशमुख, सतीश झरकर आदींसह पन्नासच्यावर सदस्यांसह चैतन्य प्रतिष्ठान परभणी शहरात कार्यरत आहे.
या प्रवचनमालेसाठी शहरासह परिसरातील इतर ठिकाणांहूनही भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. त्यामुळे यंदाही होणार्या प्रवचनमालेसाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.


