परभणी,(प्रतिनिधी) : शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.18) सकाळी शेतकर्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील लाखो शेतकर्यांचा खरीप 2024 सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांचा अग्रीम, वैयक्तिक तक्रारी व इतर 500 कोटी रुपयाचा पिक विमा आयसीसीआय लोम्बार्ड कंपनीकडे थकीत आहे. पाठपुरावा करून सुद्धा पिक विमा कंपनी शेतकर्यांना दाद देत नसल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. डॉ. सुभाष कदम, हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे, गोविंद लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मोंढा मार्केट कमिटीपासून या मोर्चास प्रारंभ झाला. येथून हा मार्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पिक विमा जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्याद्वारे, पिकविमा नुकसान भरपाई देण्यास जाणीवपूर्वक विलंब करुन कायदेभंग केल्याबद्दल आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकावे. जिल्हयातील लाखो शेतकर्यांचे आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीकडे खरीप हंगाम 2024 मधील थकलेली 25 टक्के अग्रीन पिक विमा नुकसान भरपाई, स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान अंतर्गत भरपाई व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई अशी एकूण 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आठ दिवसांत शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. शेतकर्यांप्रति उदासीन असलेल्या प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निलंबित करून पूर्णवेळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील शेवटच्या शेतकर्याने उत्पादित केलेले सोयाबीन खरेदी होण्याकरिता ऑनलाइन नोंदणी नव्याने सुरू करून संपूर्ण सोयाबीन खरेदीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. पंतप्रधान पिक विमा योजनेत कोणत्याही सुधारणा करण्यापूर्वी प्रत्येक जिल्हयातील शेतकर्यांना विश्वासात घेण्यात यावे, आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.


