नवी दिल्ली, – राज्यसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात खासदार डॉ. फौजिया खान यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांच्या असमर्थतेवर गंभीर चिंता व्यक्त केली. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत होणाऱ्या प्रयत्नांनंतरही ग्रामीण आणि आदिवासी भागांत योग्यरित्या सुसज्ज रुग्णवाहिकांची कमतरता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. खान यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला, जिथे एका गर्भवती महिलेचा योग्य सुविधा नसलेल्या रुग्णवाहिकेमुळे जीव गेला. त्यांनी नुकत्याच आलेल्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) अहवालाचा संदर्भ देत सांगितले की, ग्रामीण आणि आदिवासी भागात मूलभूत आरोग्य सेवा पुरविणाऱ्या रुग्णवाहिकांची मोठी टंचाई आहे.
डॉ. खान यांनी सरकारला आरोग्य मंत्र्यांना विचारले की, अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी कोणते ठोस उपाय केले जात आहेत? तसेच, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मूलभूत जीवनरक्षक (BLS) आणि प्रगत जीवनरक्षक (ALS) रुग्णवाहिका वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
यावर उत्तर देताना माननीय आरोग्यमंत्री यांनी डॉ. खान यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेतली आणि आपत्कालीन आरोग्यसेवा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारने उपाययोजना केल्या असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, NHM अंतर्गत राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवले जाते, जिथे राज्ये आपल्या गरजेनुसार कार्यक्रम अंमलबजावणी योजना (PIP) सादर करतात. त्यानुसार केंद्र सरकार आवश्यक साधनसंपत्ती उपलब्ध करून देते.
मंत्र्यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रीय रुग्णवाहिका कोड (AIS 125) नुसार रुग्णवाहिका सेवा सुधारल्या जात आहेत. या कोडमध्ये वाहनांची मापदंड, सुरक्षितता वैशिष्ट्ये, अग्निशमन यंत्रे आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित केले आहेत. विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक पाच लाख लोकसंख्येसाठी एक ALS रुग्णवाहिका आणि प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक BLS रुग्णवाहिका उपलब्ध आहे.
डॉ. फौजिया खान यांनी सरकारला त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. त्यांनी खासकरून ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवांचे सशक्तीकरण करण्यासाठी सातत्याने आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केले