परभणी,(प्रतिनिधी) : येथील प्रसिध्द कंत्राटदार तथा सामाजिक कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी भागवत किशनराव खोडके पाटील यांचे शनिवारी (दि.29) सकाळी तेलंगणातील श्रीशैलम जवळ एका रस्ते अपघातात निधन झाले. मृत्यूसमयी ते 66 वर्षांचे होते.
मुंबई येथील पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे व त्यांचे सहकारी भागवत खोडके हे त्यांच्या वाहनाने देवदर्शनाकरीता निघाले होते. तेलंगणातील श्रीशैलमजवळ एका बसने दिलेल्या जोरदार धडकेत खोडके हे जागीच मृत्यूमुखी पडले तर त्यांचे सहकारी डॉ. पठारे हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरु असतांना त्यांचेही निधन झाले. या अपघातात कार चालक बचावला. दरम्यान, खोडके पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील शेवगाव खोडके येथील मूळ रहिवाशी होत. ते परभणीत वास्तव्यास होते. येथील नामवंत कंत्राटदार होते. तसेच पूर्णवादी परिवाराचे ते सदस्य होते. जीवनकला मंदिराचे ते अध्यक्ष होते. अन्य सामाजिक व धार्मिक संस्थांशी ते संलग्न होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटूंबियांसह मित्र परिवार व परभणीकरांना मोठा धक्का बसला.