परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरातील समांतर पाणी पुरवठा योजना,भूमिगत गटार योजना आणि रखडलेले नाट्यगृह हे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत.त्यामुळे लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल अशी माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
परभणी शहरात समांतर पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार योजना मार्गी लागावी तसेच रखडलेले नाट्यगृह पूर्ण व्हावे यासाठी आ.डॉ.राहुल पाटील हे मागील काही दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत.दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी येथे आले होते, त्यावेळी देखील आ.पाटील यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली त्यानुसार मंत्रालयामध्ये आज सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली.या बैठकीला पालकमंत्री मेघना बोर्डीकर,अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल आ.डॉ.राहुल पाटील वित्त विभागाचे सचिव गोपाल देवरा तसेच नगर विकास खात्याचे सचिव श्री गोविंदराज उपस्थित होते तर ऑनलाईन पद्धतीने आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आयुक्त धर्यशील जाधव उपस्थित होते.
यावेळी आ.राहुल पाटील यांनी शहराला समांतर पाणीपुरवठा गरजेचे आहे हे पटवून दिले तसेच भूमिगत गटार योजना झाल्यास शहरातील सांडपाण्याची व्यवस्था मार्गी लागेल याबाबत माहिती दिली. त्यावर अजितदादा यांनी तात्काळ समांतर पाणीपुरवठा योजनेला निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना वित्त विभागाच्या सचिवांना दिल्या .तसेच भूमिगत गटार योजना लवकर सुरू करावी असे आदेश दिले. परभणीतील रखडलेल्या नाट्यगृहासाठी 13 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला तसेच तालुका क्रीडा संकुलासाठी कृषी विद्यापीठ परिसरात 25 एकर जमीन, मलनिस्सारण प्रकल्पासाठी दहा एकर आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी 18 एकर जमीन देण्याचे जाहीर करण्यात आले.
परभणी शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यापासून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून अजित दादा यांनी सकारात्मक भूमिका घेत आपण सादर केलेले सर्व प्रस्ताव आणि मागण्या मान्य केल्या आहेत, त्यामुळे लवकरच ही कामे सुरू होतील असा विश्वास आहे असे आ.राहुल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.