परभणी (प्रतिनिधी) आगामी परभणी शहर महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी परभणी महानगरतर्फे निवडणूक पूर्व तयारी कार्यशाळा आज श्री शिवाजी महाविद्यालय सभागृहात उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. इच्छुक उमेदवारांना निवडणूक नियोजन, बूथव्यवस्थापन, प्रचार धोरणे, कायदेशीर बाबी, सोशल मीडिया समन्वय तसेच संघटनात्मक तयारीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध प्रभागांतील इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, प्रभाग संयोजक, बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. या शुभारंभ सोहळ्यास मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री संजयजी कौडगे (मराठवाडा संघटन मंत्री), परभणी महानगर निवडणूक प्रमुख मा.आ. श्री सुरेशराव वरपूडकर, ज्येष्ठ नेते मा. श्री विजयराव वरपूडकर, आयोजक भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष मा. श्री शिवाजीराव भरोसे, डॉ. केदार खटिंग, प्रमुख वक्ते मा. श्री विजय वरुडकर, मार्गदर्शक मा. श्री धनंजय खाडिलकर यांची उपस्थिती लाभली.
यानंतर कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मजबूत यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी विकासनिष्ठ कार्य, संपर्क मोहिमा आणि बूथस्तरीय संघटन अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते विजय वरुडकर यांनी निवडणूक व्यवस्थापनातील आधुनिक पद्धती, सोशल मीडिया रणनीती आणि मतदारांशी संवादाची प्रभावी तंत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर मार्गदर्शक धनंजय खाडिलकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वरूप, अधिकार, जबाबदाऱ्या तसेच प्रभागनिहाय आव्हानांवर प्रकाश टाकला. विविध विभागातील तज्ज्ञांनी मतदारसंघाचे विश्लेषण, नियोजन पद्धती व विजयासाठी आवश्यक असलेल्या टप्प्याटप्प्याच्या तयारीवर भर दिला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपापल्या भाषणातून पक्षाच्या विचारसरणी, विकासनिष्ठ कार्य आणि मतदारांपर्यंत तळागाळात पोहोचण्याची गरज अधोरेखित केली. ‘‘संघटित काम आणि सकारात्मक संदेश हेच निवडणुकीतील यशाचे खरे सूत्र आहे,’’ असे मत ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. आगामी निवडणुकांमध्ये परभणी महानगरात भव्य विजय मिळविण्याचा निर्धार करून कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.


