परभणी ( प्रतिनिधी) पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद, मुंबईशी संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून मंगळवार, दिनांक ६ जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यातील पत्रकार, त्यांचे कुटुंबीय तसेच वृत्तपत्र व डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे महाशिबीर देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, परभणी येथे संपन्न होणार आहे.
अत्यंत दगदगीच्या आणि तणावपूर्ण कामकाजात कार्यरत असलेल्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यामध्ये मराठी पत्रकार परिषद नेहमीच अग्रेसर राहिली आहे. दरवर्षी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते; मात्र यावर्षी हे महाशिबीर दर्पण दिनानिमित्त आयोजित करण्यात येत आहे, हे विशेष आहे.
या आरोग्य तपासणी महाशिबिरामध्ये परभणीसह मुंबई येथील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून पत्रकार, त्यांचे कुटुंबीय तसेच वृत्तपत्र व डिजिटल मीडिया क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली जाणार आहे. गरज भासल्यास पुढील उपचारासाठी मार्गदर्शन व मदतही करण्यात येणार आहे.
महाशिबिरामध्ये HbA1c, BSL, लिपिड प्रोफाइल, थायरॉईड (T3, T4, TSH), CBC, RFT, LFT तसेच कॅन्सर तपासणीसह विविध रक्त तपासण्या करण्यात येणार असून तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबीयांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या आरोग्य तपासणी महाशिबिरानंतर लगेचच दर्पण दिनाचा मुख्य कार्यक्रम दुपारी १२ वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सिम्पोसियम हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यात नुकतेच निवडून आलेल्या सातही नगराध्यक्षांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच शहिद भगतसिंग प्रतिष्ठाण, परभणी व परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे वरिष्ठ बातमीदार गणेश पांडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या आरोग्य तपासणी महाशिबीरासह दर्पण दिन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


