फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा नियोजन बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलू: (प्रतिनिधी) शहरातील मयुरी पार्क येथे ज्ञानेश्वरी ग्रंथास ७५० वर्षे पूर्ण झाल्या निमित्त ११ मार्च ते १९ मार्च पर्यंत आयोजित होणारा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याचे उत्तम नियोजन होत आहे. हा सांगता सोहळा सेलूच्या परंपरेला साजेसा सुंदर साजरा करू, सोहळ्यास कशाचीही कमतरता भासणार नाही. असा अश्वासक शब्द फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा नियोजन बैठकीत पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर – साकोरे यांनी दिला.
शहरातील बालाजी मंदिरातील सिंदूर सभागृहात बुधवार ( दि. ११ ) रोजी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा नियोजन बैठक उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.नामदेव महाराज ढवळे हे होते. तर व्यासपीठावर पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर – साकोरे, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, नगर सेवक विनोद बोराडे, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, दत्तराव पावडे, संजय साडेगावकर, महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया कोठेकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर- साकोरे म्हणाल्या की, ” सेलू शहरात फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळते आहे ही खुप आनंदाची गोष्ट आहे. एका ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सर्वच साक्षीदार होणार आहोत. हा पारायण सांगता सोहळा ऊर्जा देणारा ठरेल. ” असेही त्या म्हणाल्या.
या प्रसंगी नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी ” सोहळ्यास नगर परिषदेचे संपूर्ण सहकार्य राहील.” असे सांगितले. तर जयप्रकाशजी बिहाणी यांनी ” सोहळ्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाज पत्रक मांडून सोहळ्यास आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले. ” प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी ” सोहळा यशस्वीतेसाठी गठीत होणाऱ्या विविध २६ समित्या सांगून , सर्वांनी स्वयंप्रेरणेने आपल्या आवडत्या समितीत सहभागी होऊन सेवा द्यावी असे आवाहन केले. ” ह.भ.प. डाके महाराज यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. दत्तराव पावडे, ह.भ.प. एकनाथ महाराज कटारे, विनोद बोराडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ह.भ.प. कृष्णा महाराज रासवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संजय पिंपळगावकर यांनी सुत्रसंचलन केले. तर आभार प्रदर्शन ह.भ.प. रमेश महाराज यांनी केले. बैठकीत ह.भ.प. रामराव हेंडगे, शिवाजी महाराज खवणे, डाके महाराज, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, नंदकिशोर बाहेती, संजय साडेगावकर, पांडुरंग मगर, गोविंदभाऊ जोशी,किशोर जोशी, रामप्रसाद रासवे, रामराव डख, जिजाभाऊ सोळुंखे, रुस्तुम कदम, रामराव गिराम, व्यंकटेश काबरा, विलास घुबे, राहुल राजुरकर, रोहित काला, शिवाजी बुधवंत, राजस्थानी महिला मंडळ, महिला मंडळ सेलू यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यास भरिव आर्थिक योगदान जाहीर करून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


