परभणी, (प्रतिनिधी) — महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, परभणी यांच्या वतीने वार्षिक क्रेडिट प्लॅन 2026-27 कार्यशाळेचे आयोजन हॉटेल विसावा, स्टेशन रोड, परभणी येथे करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र अकुलवार व नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रांजल गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय सल्लागार संदीप मराठे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार उत्कर्ष श्री.भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी, वित्तीय संस्था व महामंडळांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये पीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुरुंदकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक मकरंद सरकटे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक विनय सावंत, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक महेश चव्हाण, एचडीएफसी बँकेचे विभागीय व्यवस्थापक कैलास पारदे व संघर्ष खाडे, आयसीआयसीआय बँकेचे राहुल लोंढे व किरण राठोड तसेच विविध महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा समन्वय अधिकारी जया नेमाने यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यशाळेत राज्यस्तरीय नव-तेजस्विनी प्रकल्पाचे सादरीकरण संदीप मराठे यांनी केले. तर आर्थिक वर्ष 2026-27 साठीचा जिल्हास्तरीय क्रेडिट प्लॅन जया नेमाने यांनी सादर केला. या क्रेडिट प्लॅनमध्ये 951 महिला बचत गटांसाठी 40.34 कोटी रुपये तसेच 1050 सूक्ष्म उद्योग कर्ज प्रकरणांसाठी 5.25 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
मार्गदर्शन करताना श्री.भोळे यांनी महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँकांनी अधिक सहकार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र अकुलवार, नाबार्डचे प्रांजल गुल्हाने, पीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कुरुंदकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश सरकटे, आयसीआयसीआय बँकेचे राहुल लोंढे, आरसेटीच्या प्राध्यापिका मनीषा कदम तसेच उपस्थित बँका व महामंडळांच्या प्रतिनिधींनी सन 2026-27 च्या क्रेडिट प्लॅनची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना कुलकर्णी तर आभार प्रदर्शन परमेश्वर मुनेश्वर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लेखाधिकारी धनंजय कुलकर्णी माविम परभणी), एमआयएस सल्लागार कैलास मोतीपवळे तसेच सर्व सीएमआरसी व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले.


