परभणी (प्रतिनिधी) असोला गाव पांदणमुक्त होण्याच्या औचित्याने असोला ते परभणी पांदण रस्त्याचे लोकार्पण भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या विकासकामांतर्गत असोला–परभणी, असोला–मुरुंबा, असोला–कारेगाव, मुरुंबा रोड ते गट क्र. २२७ तसेच तट्टूजवळील पांदण ते नागोराव भरोसे यांच्या शेतापर्यंतच्या मार्गांसह असोला गावातील सर्व पांदण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामांमुळे असोला गाव अधिकृतपणे पांदणमुक्त झाले आहे.
या कार्यक्रमास सरपंच उमाकांत भरोसे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष. दशरथ जावळे, माजी उपसरपंच. व्यंकटी जावळे, पोलीस पाटील. पंढरी रिक्षे, ग्रामपंचायत सदस्य. पांडुरंग जावळे, बाळासाहेब जावळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असोला गावातील सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे गावातील सुमारे ७५० शेतकरी बांधवांना थेट लाभ झाला आहे. या रस्त्यांमुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कायमस्वरूपी, सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध झाला असून शेतीमालाची वाहतूकही अधिक सोयीची होणार आहे. ग्रामविकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी राज्याचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत, शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमामुळे असोला गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त केली.


