परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने खेळाडू आयोग (अॅथलीट्स कमिशन) स्थापनेच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. असोसिएशनच्या प्रशासनात खेळाडूंचे प्रभावी आणि अर्थपूर्ण प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे, खेळाडूंच्या हिताचे व कल्याणाचे संरक्षण करणे तसेच पारदर्शकता, उत्तरदायित्व, प्रामाणिकता आणि सुशासनाची तत्त्वे अधिक बळकट करणे हा या आयोगाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अंतर्गत या खेळाडू आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. आयोग स्थापन झाल्यानंतर खेळाडूंना संघटनेच्या प्रशासनात स्वतःचे हित, अधिकार आणि कल्याणाशी संबंधित बाबी प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच खेळ प्रशासनात खेळाडूंचा सक्रिय सहभाग वाढवून क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
या आयोगासाठी जिल्ह्यातील ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत अथवा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे, तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू किंवा वरिष्ठ, कुमार व किशोर गटातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेते अथवा सहभागी झालेले खेळाडू अर्ज करू शकतात. अर्जदार हा किमान एक वर्षापूर्वी खेळातून निवृत्त झालेला असावा. तसेच त्याचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 70 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
पात्र आणि इच्छुक माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंनी दि. 5 ऑगस्ट 2026 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज भरून संघटनेच्या अधिकृत ई-मेल-MangalPande1947gmail.com वर पाठवावा तसेच अर्जाची मूळ प्रत संघटनेच्या सचिवांकडे जमा करावी. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र खेळाडूंची निवड केली जाणार असून, या प्रक्रियेत पुरुष आणि महिला खेळाडूंना समान संधी दिली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अधिकृत सभासदत्व मिळणार असून, सभेतील सर्व अधिकार त्यांना प्राप्त होतील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंनी या उपक्रमात सहभागी होऊन संघटनेचे प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश वरपूडकर आणि सचिव मंगल पांडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संघटनेचे सचिव मंगल पांडे यांच्याशी 9423442999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
Tuesday, September 15
ताज्या बातम्या:
- शुभम मस्केची सुरेल भरारी; ‘सा रे ग म प’मध्ये परभणीच्या युवा गायकाची टॉप-१२ मध्ये धडक
- कै. प्रा. शंकर गंधम सर स्मृती राज्य रस्सीखेच स्पर्धा उत्साहात संपन्न; लातूर, ठाणे, बुलढाणा व मुंबई ,नांदेड़ जिल्हा अव्वल स्थानी
- डॉ. संदीप चव्हाण यांची ग्राहक संरक्षण परिषदेत अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती
- जी-1 हॉस्पिटल येथे दि 29 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
- वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
- आनंदराव भरोसे यांच्या हस्ते शेतकरी मेळाव्याच्या सभामंडपाचे भूमिपूजन
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर


