विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अभाविपचे टाळनाद आंदोलन
परभणी (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद बैठक परभणी येथे पार पडत असताना विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी महानगर यांच्या वतीने विद्यापीठ उपकेंद्र येथे “स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात टाळनाद आंदोलन” करण्यात आले. हे आंदोलन अभाविपचे प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
यावेळी अभाविपचे प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे म्हणाले की, परभणी जिल्हा व परिसरातील हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हे उपकेंद्र भाड्याच्या इमारतीत कार्यरत असून विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक व प्रशासकीय सुविधा मिळत नाहीत. विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून आवश्यक असल्यास उपकेंद्राच्या जागेचा पुनर्विचार करावा आणि लवकरात लवकर स्वतंत्र इमारतीचे बांधकाम पूर्ण करून पूर्णवेळ संचालक, आवश्यक अधिकारी-कर्मचारी व सर्व सुविधा उपलब्ध करून उपकेंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे.
ते पुढे म्हणाले, विद्यापीठाने बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांवर ₹६०० इंटरनेट फी लादली आहे. प्रत्यक्षात या अभ्यासक्रमांमध्ये इंटरनेट सुविधा किंवा संगणक प्रयोगशाळेचा नियमित वापर होत नसताना हे शुल्क आकारणे अन्यायकारक आहे. सुविधा न देता विद्यार्थ्यांवर आर्थिक भार टाकणे योग्य नाही. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारी इंटरनेट फी तात्काळ रद्द करण्यात यावी.
यावेळी अभाविपच्या परभणी महानगर मंत्री कु. गायत्री लाड म्हणाल्या की, परभणी जिल्ह्यातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम स्थानिक स्तरावर उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेला B.A. Administrative Services हा अभ्यासक्रम परभणी उपकेंद्रात तातडीने सुरू करण्यात यावा. या अभ्यासक्रमामुळे एमपीएससी, यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल. विद्यार्थ्यांना प्रशासकीय व्यवस्थेचे ज्ञान मिळून शासन, निमशासकीय व प्रशासकीय सेवांमध्ये करिअरच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

त्या पुढे म्हणाल्या, विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून जिमखाना शुल्क, लायब्ररी डिपॉझिट, कुलगुरू कार्यालय कार्यक्रम शुल्क यांसारखी विविध शुल्क आकारली जात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी या शुल्कांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. विशेषतः जिमखाना शुल्क आकारले जात असताना अनेक महाविद्यालयांमध्ये जिमखान्याची मूलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांची चौकशी करून ज्या ठिकाणी संबंधित सुविधा उपलब्ध नाहीत, तेथे विद्यार्थ्यांकडून आकारलेले शुल्क परत करावे व भविष्यात सुविधा उपलब्ध होईपर्यंत अशी शुल्क आकारणी बंद करावी. विद्यार्थीहिताला प्राधान्य देत विद्यापीठाने पारदर्शक आणि उत्तरदायी भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करण्यात आले. तसेच मराठा आरक्षण (SEBC) अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या शैक्षणिक सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करावी, परभणी उपकेंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करावे, पारंपरिक अभ्यासक्रमांवरील इंटरनेट फी रद्द करावी आणि विद्यार्थ्यांवरील अनावश्यक आर्थिक भार कमी करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी टाळनाद करून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे, महानगर मंत्री कु. गायत्री लाड, विभाग विद्यार्थिनी प्रमुख सेजल काळे, विभाग संयोजक मुक्तेश भंडारे, महानगर सहमंत्री ओमकार डोके, हरीश मोरे तसेच अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


