जिंतूर,(प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची निवडणूकीच्या प्रचारार्थ जिंतूरात बुधवारी (दि.13) दुपारी 2 वाजता परभणी रस्त्यावरील साई मैदानावर मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री शाह बुधवार जिंतूर येेेथे दुपाारी 2 वाजता दाखल होत आहेत. आ. सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह नेतेमंडळी व पदाधिकार्यांनी सभेची तयारी पूर्ण केली असून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी लगबग सुरू आहे.
आमदार सौ. मेघना बोर्डीकर यांनी या सभेच्या निमित्ताने जिंतूर तालुका तसेच सेलू तालुक्यातील शहरासह खेड्या-पाड्यांमधून मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेत या दृष्टीने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भक्कम असे नियोजन केले आहे. विशेषतः गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध प्रभागांपासून वाडी-तांड्यांपर्यंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी, छोटेखानी बैठकांमधून भक्कम असे नियोजन केल्या गेले आहे. या ग्रामस्थांनी सभास्थळी वेळेच्या आत पोहोचावे या दृष्टीनेही नियोजन केल्या गेले आहे. विशेषतः जिंतूर तालुक्यावर संख्याबळाकरीता सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले असून सभेच्या निमित्ताने शहरासह या संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मितीही करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना शिंदे गटाचे नेते व कार्यकर्ते सभेच्या यशस्वीतेकरीता कंबर कसून आहेत.
सभेनिमित्त वाहतूकीत बदल
जिंतूर ते परभणी या महामार्गावर सभेचे स्थळ आहे. तसेच सभास्थळापासून हिंगोली, नांदेड, जालना तसेच छत्रपती संभाजी नगर या ठिकाणांकडे ये-जा करणारी वाहतूक मोठी आहे. सतत वर्दळीच्या असणार्या या रस्त्यावर या सभेच्या निमित्ताने वाहतूकीची कोंडी होवू नये म्हणून जिल्हा पोलिस दलाने अतिमहत्वाच्या व्यक्तीची सभा ओळखून या महामार्गावर बुधवारी सकाळी 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूकीत बदल केले आहेत. विशेषतः जालन्याकडून जिंतूरकडे किंवा पुढे औंढा नागनाथकडे जाणारी अवजड वाहने ही देवगाव फाटा येथून जिंतूरकडे न येता सेलू, पाथरी, पोखर्णी, सिंगणापूर फाटा, ताडकळस, पूर्णा मार्गे नांदेडकडे वळविण्यात आली आहेत. तर जालना मार्गे जिंतूरकडे किंवा पुढे औंढा नागनाथकडे जाणारी खाजगी वाहने देवगाव फाटा येथून सेलू, मानवत रोड, पेडगाव, परभणीकडून वळविण्यात आली आहेत. जालना मार्गे जिंतूर व हिंगोलीकडे जाणारी अवजड वाहने मंठा, लोणार, लोणी, रिसोड, सेनगाव मार्गे हिंगोलीकडे वळविण्यात आली आहेत. दरम्यान, सभास्थळाच्या चोहोबाजूंनी वाहनांची पार्कींग व्यवस्थासुध्दा करण्यात आली आहे.


