रामकृष्ण नगरात कॉफि विथ आनंदराव’ कार्यक्रम
परभणी,(प्रतिनिधी) गेल्या दहा वर्षात स्थानिक लोकप्रतिनिधींनी महानगरातील अनेक प्रश्नांकडे काडीमात्र लक्ष दिले नाही. विकासाच्या गप्पा मारण्यात मात्र कृति शुन्य होते. त्यामुळे या महानगरपालिका हद्दीतील अनेक प्रश्न चिघळले. ते प्रश्न आता आ वासून उभे आहेत. त्यामुळेच परभणी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी केले.
शहरातील रामकृष्ण नगरात मंगळवारी (दि.12) नवशा मारोती मंदिराच्या सभागृहात भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अभिषेक वाकोडकर यांच्यासह मित्र मंडळाने आयोजित केलेल्या ‘कॉफि विथ आनंदराव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नागरीकांशी संवाद साधतेवेळी भरोसे बोलत होते. परभणी सारख्या महानगरातील विकास कामे पूर्णतः खुंटली आहेत. बहुतांशी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. नटराज रंग मंदिराचे पुनर्जीवन असो की नवीन नाट्यगृहाचे काम ठप्प आहे. जिल्हास्थानच्या बसस्थानकाचे कामसुध्दा अपूर्ण अवस्थेत आहे. शहरात भूमीगत गटार योजना अद्याप राबविण्यात आली नाही. रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत. तसेच सांडपाण्याच्या विल्हेवाटीसह नाल्यांचे प्रश्न त्याहीपेक्षा गंभीर आहेत. धूळ असो, दुर्गंधी व स्वच्छतेचे प्रश्न गंभीर आहेत. गेल्या दहा वर्षात स्थानिक लोकप्रतिनिधींनी महानगरातील या प्रश्नांकडे काडीमात्र लक्ष दिले नाही. विकासाच्या गप्पा मारण्यात मात्र लोकप्रतिनिधींनी सातत्याने आघाडीवर होते, कृतीत मात्र शुन्य होते. त्यामुळे या महानगरपालिका हद्दीतील अनेक प्रश्न चिघळले. ते प्रश्न आता आ वासून उभे आहेत. त्यामुळेच परभणी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत, असे भरोसे यांनी नमूद केले. आपण परभणी शहराच्या विकासाकरीता पूर्णतः कटिबध्द आहोत, अशी ग्वाहीही भरोसे यांनी यावेळी दिली.


