मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे- पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी
परभणी जिल्ह्यात मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज
परभणी, (प्रतिनिधी)विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी, (दि.20) मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सांयकाळी 6.00 पर्यंत आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. तर मतदानाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक जनार्धन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, संतोषी देवकूळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. जिल्ह्यातीत चारही विधानसभा मतदार संघात एकुण 06 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात 95-जिंतूर विधानसभा मतदार संघात 02 तर 96-परभणी मध्ये 02, 97-गंगाखेड मध्ये 01, 98-पाथरी 01 विधानसभा मतदार संघात संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर विशेष लक्ष राहणार असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. यातील सुमारे 931 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात 30 ऑक्टोबर, 2024 पर्यंत 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 262 पुरुष, 1 लाख 88 हजार 22 महिला, 10 तृतीयपंथी असे 3 लाख 88 हजार 294 मतदारांची संख्या आहे. 96-परभणी विधासभा मतदारसंघात 1 लाख 78 हजार 808 पुरुष, 1 लाख 71 हजार 740 महिला, 11 तृतीयपंथी असे 3 लाख 50 हजार 559 मतदारांची संख्या आहे. 97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 2 लाख 18 हजार 120 पुरुष, 2 लाख 03 हजार 147 महिला, 5 तृतीयपंथी असे 4 लाख 21 हजार 272 मतदारांची संख्या आहे. 98-पाथरी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 03 हजार 45 पुरुष, 1 लाख 90 हजार 197 महिला, 2 तृतीयपंथी असे 3 लाख 93 हजार 244 असे एकूण 15 लाख 53 हजार 369 मतदार आहेत.
परभणी जिल्ह्यात चारही विधानसभा मतदार संघात एकूण 1 हजार 623 मतदान केंद्रे आहेत. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात 438 मतदान केंद्र तर परभणी 338, गंगाखेड 432 आणि पाथरी 415 मतदान केंद्रे आहेत. यात सहाय्यकारी मतदान केंद्रांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 1 महिला मतदान अधिकारी केंद्र, 1 दिव्यांग अधिकारी मतदान केंद्र आणि 01 तरुण अधिकारी मतदान केंद्र असणार आहे.
परभणी जिल्हा विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया शांतता आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी 1 हजार 623 मतदान केंद्रावर 1 हजार 738 पोलीस अधिकारी/कर्मचारी आणि 1 हजार 417 होमगार्डसह 12 हजार 568 अधिकारी/कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असुन, संवेदशील मतदान केंद्रावर अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
निवडणूक काळात अवैध कारवाया रोखण्यासाठी पोलीस विभागाने घेतलेल्या दक्षतेबाबत व केलेल्या कारवाईंबाबत यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्हयात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सजग आहे. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे याकरीता जिल्हयात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. (छाया उत्तम बोरसुरीकर)

****


