महाविद्यालयाच्या जागेची केली पाहणी
परभणी,(प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून दोन वर्षात बांधकाम पूर्ण करू, असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
गंगाखेड रस्त्यावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची शुक्रवारी (दि.14) मंत्री बोर्डीकर यांनी पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या. परभणी दौर्यावर आल्या असता त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारत संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रस्तावित जागेची पाहणी केली. गंगाखेड रोडवर गोरक्षणाच्या जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व अधिकार्यांना बोलावून घेत आवश्यक त्या सूचना केल्या, लवकरात लवकर इमारत बांधकाम सुरू करून ते पूर्ण करण्याबाबत अधिकार्यांना सूचना दिल्या. स्वतंत्र इमारत उभी राहिल्यानंतर महाविद्यालयाची मोठी अडचण दूर होणार असून विद्यार्थी आणि रुग्ण यांची देखील गैरसोय होणार नाही, असे बोर्डीकर म्हणाल्या.
यावेळी महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवार, उपअधीक्षक डॉ. सचिन गरुड, उद्धवराव पवार, प्रशासकीय अधिकारी राज लखमवाड, अनिता भुसारे, अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे उपस्थित होत्या. 100 विद्यार्थी व 400 खाटांचे रुग्णालयास मान्यता मिळालेली आहे. लवकरच कर्करोग निदान व उपचार सुवीधा सुरु होणार आहेत. त्यासह इतर उपचार सुविधा सुरु होणार आहेत.पालकमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने इमारत बांधकाम सुरु होणार आहे, असे डॉ.भिसे यांनी सांगितले.


