सेलू, (प्रतिनिधी): प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे आज फिनलंड पालकत्व कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने करण्यात आले होते. डॉ. संजय रोडगे, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत ऑनलाइन आणि ऑफलाइन सत्रांद्वारे पालकांना मुलांच्या शिक्षण आणि पालकत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ऑनलाइन सत्रात फिनलंड येथील मिला वान दर बरघ, सीईओ, किंडलडेज, टॅम्परे, फिनलंड यांनी फिनलंडच्या प्रगत शिक्षण पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी फिनलंडच्या शिक्षण पद्धतीतील वैशिष्ट्ये, विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन आणि कृती आधारित शिक्षण यावर प्रकाश टाकला. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
ऑफलाइन सत्रात प्रसिद्ध युट्यूबर आणि मोटिव्हेशनल स्पीकर सौ. संज्योत वैद्य यांनी पालकांना मुलांच्या मानसिक आणि शैक्षणिक विकासासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याशिवाय, शिक्षणतज्ञ दुर्गा कढणे, मर्लीन इलिशा, श्रद्धा देशमुख, प्रिया ठाकूर, लीना चिलवंत, आणि महेश पाटील यांनी मुलांचे शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि पालकत्वाच्या विविध पैलूंवर आपले विचार मांडले. या तज्ञांनी आधुनिक शिक्षण पद्धती आणि पालक-मुलांमधील संवाद वाढवण्याच्या पद्धतींवर भर दिला.
कार्यशाळेचे प्रास्ताविक श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सॅनरो एज्युकेअर प्रा. लि. चेअरमन डॉ. संजय रोडगे यांनी केले. त्यांनी आपल्या फिनलंड शैक्षणिक दौऱ्याच्या अनुभवातून प्रेरणा घेऊन सुरू केलेल्या कृती आधारित नवीन शिक्षण पद्धती ‘क्युरिअस किड्स’ विषयी माहिती दिली. या पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सर्जनशीलता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील नव्या संकल्पनांचे महत्त्व आणि पालक-शिक्षकांचे सहकार्य यावर आपले विचार मांडले.
या कार्यशाळेला प्रा. महादेव साबळे, प्रशासकीय अधिकारी, तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रॉसपरस पब्लिक स्कूलच्या सौ. प्रगती क्षीरसागर, उत्कर्ष विद्यालयचे श्री. कैलास ताठे, ज्ञानतीर्थ विद्यालय (माध्यमिक), सेलूचे हरिभाऊ कांबळे, आदित्य फार्मसी कॉलेज, प्रा. अक्षय बन, डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालयच्या सौ. मिनाक्षी रत्नपारखी तसेच आदित्य जुनिअर कॉलेज, वालूरचे गणेश सोळंके यांचा समावेश होता.
या कार्यशाळेमुळे पालकांना मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाबाबत नवीन दृष्टिकोन मिळाला. पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि अशा कार्यशाळांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.