माध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळा संपन्न
परभणी, (प्रतिनिधी): निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन केलेल्या पत्रकारांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर याच कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित मार्गदर्शन सत्र कार्यशाळेत अधिकारी व तज्ञांनी राज्य शासनातर्फे पत्रकारांसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र व पत्रकारीता आणि वृत्तसंकलन-संपादनात शुध्दलेखनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी श्री. गावडे पत्रकारांचे कौतुक करताना म्हणाले की, गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यमांनी उत्कृष्ट वार्तांकन केल्यामुळे जिल्ह्यात मतांचा टक्का वाढला. लोकशाही शासनप्रणालीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांनी केलेल्या जनजागृतीमुळेच मतदानाचा टक्का वाढल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात माध्यम प्रतिनिधींचा विशेष गौरवपर कार्यक्रम व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी देवेंद्र सिंह, प्रा. दीपक रंगारी, नायब तहसिलदार सतीष रेड्डी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, पत्रकारांच्या लेखनीमुळेच प्रशासन आणि समाजातील चुका लक्षात येतात. त्यांच्या लेखणीद्वारेच प्रशासन व सामान्य नागरिक यांच्यात संवाद घडतो. पारदर्शकता, जबाबदारी व समाजप्रबोधनाची भूमिका पत्रकार पार पाडत असतात. त्यामुळे माध्यमे नेहमीच सजग असतात. पत्रकारांचा सन्मान म्हणजेच समाजाच्या सजगतेचा सन्मान असे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी बदलत्या निवडणूक प्रक्रियेसोबतच, निवडणुकीत झालेला बदल, बदलते प्रवाह, मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी, मतदान केंद्र, मतदान यंत्र यासह पत्रकारांची भूमिका याबाबत माहिती दिली. लोकशाही शासन व्यवस्थेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ती भूमिका माध्यमे अतिशय तटस्थपणे पार पाडतात. माध्यमेच भारतीय निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण करू शकले, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांनी केले, तर आभार जिल्हा माहिती अधिकारी श्री. धोंगडे यांनी मानले.
प्रारंभी जिल्ह्यातील विविध प्रसार माध्यमांतील पत्रकारांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. काही पत्रकारांनी प्रातिनिधिक स्वरुपात समयोचित आपले मनोगत व्यक्त करत प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा*
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हा सूचना अधिकारी देवेंद्र सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याबाबत तर शिक्षक दीपक रंगारी यांनी वृत्तसंकलन – संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. अधिस्वीकृती पत्रिका, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार याबाबत माहिती दिली.
प्रा. दीपक रंगारी यांनी वृत्तसंकलन – संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. मराठी प्रमाणभाषेच्या शुद्धलेखनाचे नियम, शब्दाचा अर्थ, भाषेतील व्याकरणाचा वापर याबरोबरच मराठी भाषा समृद्ध करण्यात विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. वाक्यामध्ये येणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यय, ऱ्हस्व, दीर्घ,ईकारांत याबरोबरच एकाक्षरी क्रियापद, शब्दयोगी अव्यय, तत्सम आणि तद्भव शब्दांविषयीचे स्पष्टीकरण उदाहरणासह समजावून सांगितले. पत्रकाराने शब्दकोश आणि लेखनकोश याचा वापर करून निर्दोष लिखाण कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. विविध शब्दांच्या वाक्यानुसार आणि वेळेनुसार होणारा बदल उदाहरणासह सांगितला. तर देवेंद्रसिंह यांनी कृत्रीम बुध्दीमत्ता व पत्रकारीता याविषयी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली.
*-*-*-*-*