परभणी, (प्रतिनिधी)ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील रिक्त जागा भरण्याची कारवाई पूर्ण करा अशी मागणी आ. डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे.
राज्यामध्ये चारही कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या विविध विभागात हजारो रिक्त जागा आहेत या जागा अद्याप भरल्या नाहीत, त्यामुळे राज्यात हजारोंच्या संख्येने कृषी पदवीधारक बेरोजगार आहेत असे आ. डॉ.पाटील यांनी नमूद करत विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत या विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी मंगळवार दि.19 रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली. त्यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठवले आहे, कृषी विभागातील कृषी सेवक भरती तत्काळ पूर्ण करावी,राज्यातील शालेय शिक्षणात कृषी हा विषय अनिवार्य करून शिक्षण विभागाच्या पोर्टलवर कृषी विषयक समाविष्ट करावा, कृषी विद्यापीठातील सर्वच सवर्गातील रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, कृषी विद्यापीठातील आचार्य पदवीच्या बॅच 2023 -24 पासूनच्या विद्यार्थ्यांना सारथी महाजोती, बार्टी यांची शिष्यवृती सर्वांना देण्यात यावी, राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या सर्व शाखेत जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर कृषी पदवीधारकांची भरती करावी, पिक विमा योजना व इतर योजनांची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती शाखेत कृषी पदवीधारकांची सरकारची नेमणूक करावी मृद व जलसंधारण विभागाची कामे कृषी विद्यापीठातील पदवीधारकांना देण्यात यावीत, लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग अ वर्ग ब तसेच कनिष्ठ गट या पदांची भरती लवकरात लवकर करावी अशा मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी आ.पाटील यांच्यासह तालुका प्रमुख नंदू अवचार,युवासेना तालुकाप्रमुख संदीप झाडे,डी.एन.दाभाडे रामराव डोंगरे उमेश देशमुख शशिकांत शिंदे सुरेश खटिंग रोहित कुडके रोहित मोरे आबा खंडागळे सदानंद शिराळे मारुती सूर्यवंशी यांच्यासह कृषी पदवीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


