परभणी,(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे प्रथमच स्पीच थेरपी (वाणी उपचार) आणि मॅमोग्राफी युनिटचे उद्घाटन मोहोळचे माजी आ.राजन पाटील यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील पहिलीच अशी सुविधा असून, यामुळे स्थानिक रुग्णांना आधुनिक वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उद्घाटन सोहळ्याला आ.डॉ.राहुल पाटील, मोहोळचे माजी आमदार व सोलापूर जिल्ह्यातील सहकार महर्षी राजन पाटील, मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने, हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आमिर तडवी, डॉ. विवेक नावंदर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
स्पीच थेरपी ही वाणी दोष, श्रवण दोष, उच्चारणातील अडचणी, स्टटरींग (हकलणे), ऑटिझम, डाउन सिंड्रोम किंवा न्यूरोलॉजिकल विकारांमुळे उद्भवणाऱ्या संवाद समस्यांवर उपचार देणारी विशेष पद्धत आहे. युनिटमध्ये प्रशिक्षित स्पीच थेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट आणि अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. विशेषतः लहान मुलांमधील जन्मजात श्रवण समस्या आणि मेंदूच्या दुखापतीनंतरच्या वाणी समस्यांवर उपचार केले जातील. रुग्णांना वैयक्तिक थेरपी, ध्वनी ओळख आणि संवाद कौशल्य सुधारण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.
*मॅमोग्राफी युनिट* स्तन कर्करोगाचे वेळीच निदान.
मॅमोग्राफी ही स्तन कर्करोग शोधण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक तपासणी पद्धत आहे. डिजिटल मॅमोग्राफी युनिट कमी रेडिएशन आणि उच्च रिझोल्यूशन इमेजिंगद्वारे कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखते. ४० वर्षांवरील महिलांसाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण वेळीच निदान झाल्यास उपचाराची यशाची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे. युनिटमध्ये ३डी मॅमोग्राफी आणि बायोप्सी सुविधाही उपलब्ध आहेत.
माजी आ. राजन पाटील म्हणाले, “स्तन कर्करोग हा भारतातील महिलांसाठी गंभीर धोका आहे. वेळीच निदान न झाल्याने अनेकांचा जीव जातो. परभणीमध्ये मॅमोग्राफी युनिट सुरू होणे ही अभिमानाची बाब आहे. आर.पी. हॉस्पिटल सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा देत आहे.” यावेळी त्यांनी सर्व महिलांना वर्षातून एकदा मॅमोग्राफी तपासणी करण्याचे आवाहन केले.या वेळी आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले, “आर.पी. हॉस्पिटल हे माझ्या कुटुंबाचे स्वप्न आहे. स्पीच थेरपीमुळे विशेष गरजा असलेली मुले स्वावलंबी होतील, तर मॅमोग्राफीमुळे महिलांचे आयुष्य वाचेल.


