परभणी,(प्रतिनिधी) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी वैद्यकीय महाविद्यालय व आर.पी.हॉस्पिटल, परभणी यांनी चालू शैक्षणिक वर्षात दुसरी ‘बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन’ (BCME) कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण करून राज्यातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
राज्यातील बहुसंख्य वैद्यकीय महाविद्यालयांपैकी प्रामुख्याने परभणी मेडिकल कॉलेजनेच या वर्षी दोन MEU कार्यशाळा पूर्ण केल्या असून, ही कामगिरी संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचा ज्वलंत उदाहरण ठरली आहे.
तीन दिवसीय ही कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यात विविध शाखांतील एकूण ३० प्राध्यापकांनी उत्साहाने सहभाग घेतला. अध्यापन-अध्ययन पद्धती, मूल्यांकन तंत्र, व्यावसायिकता, धडा नियोजन (लेसन प्लॅनिंग), गटगतिशास्त्र, शैक्षणिक नेतृत्व, संप्रेषण कौशल्ये, सूक्ष्म अध्यापन (मायक्रोटिचिंग) अशा महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष कृतीशील सत्रे, गटचर्चा आणि प्रात्यक्षिकांमुळे सहभागींच्या संकल्पना अधिक स्पष्ट व दृढ झाल्या.
कार्यक्रमाचे समन्वय मेडिकल एज्युकेशन युनिटचे (MEU) समन्वयक डॉ.ओमप्रसाद दमकोंडवार व MEU सदस्य डॉ. किरण सगर यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. प्रशासकीय स्तरावर गुणवंत आहिरे व विशाल अहीर यांनी नियोजन केले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागी प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “CBME (Competency Based Medical Education) पद्धतीची आम्हाला खरीखुरी समज आता झाली आहे. व्यावहारिक सत्रे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे आम्ही आता अधिक आत्मविश्वासाने व नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकू.” अशी भावना बहुतांश सहभागींनी व्यक्त केली.


