महाभारत संदेश कथेने वातावरण चैतन्यमय
सेलू ( प्रतिनिधी) आपले प्रत्येक कर्म भगवंताची पूजा असावी. २४ तास केली जाणारी कर्म निष्काम, शुद्ध असावीत. कारण निष्काम कर्म सेवा हीच खरी पूजा आहे. असे प्रतिपादन राष्ट्रसंत स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांनी महाभारत संदेश कथेचे समारोपीय सहावे पुष्प गुंफताना मंगळवार ( दि. १७ ) रोजी केले.
अलंकापुरी नगरीत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात पुढे बोलताना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की, ” पांडवांचा राज्याभिषेक म्हणजे शाश्वत जीवन मूल्यांची प्रस्थापना आहे. माणसाचं जीवन हा एक संघर्ष आहे. या संघर्षाला कसे हाताळावे याचा उत्तम ग्रंथ म्हणजे महाभारत हा ग्रंथ आहे. ज्यांना माणसांचे गुणा अवगुण कळतात तीच माणसे जीवनात सुखी होतात. हाच संदेश महाभारत कथेतून मिळतो. ज्याला माणूस कळतो त्याला कुणाशी कसे वागावे हे कळते. या जगातून आपण काहीही घेऊन जाणार नाही. त्यामुळे उगीच कुणाला दुखवू नये. एकमेकांना समजावून घेतले पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवद्गीता अवतरली पाहिजे. आपण संतांनी सांगितलेल्या विचारानुसार जीवन जगावे. समृद्ध जीवन जगण्यासाठी आपण सर्वजण ज्ञानोबा तुकाराम यांचे खरे पाईक होऊ यात. असेही स्वामी गोविंद गिरीजी महाराज म्हणाले. सहा दिवसापासून सुरू असलेल्या महाभारत संदेश कथेचा समारोप चैतन्यमय वातावरणात झाला. भाविकांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आणि दिव्यतेज दिसून येत होते. सूत्रसंचालन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी यांनी केले. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मिनाताई बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, रामप्रसाद घोडके, नंदकिशोर शिवणारायणजी बाहेती, संजयजी बुब, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, रवी कुलकर्णी, विजय शेरे, हरिकिशन शर्मा, राम पाटील संजय साडेगावकर, प्रल्हाद कान्हेकर, अनुप कान्हेकर यांनी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे पुजन केले.


