परभणी ( प्रतिनिधी) जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात सुमारे सहा लाखांहून अधिक महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो आणि तीन लाखांपेक्षा जास्त महिलाचा मृत्यू या आजारामुळे होतो. भारतातही हा महिलांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कर्करोगांपैकी एक आहे. अनेक ग्रामीण भागामध्ये योग्य माहितीचा अभाव, लाज, भीती आणि गैरसमज यामुळे महिलांना वेळेवर तपासणी किंवा प्रतिबंधात्मक उपाय मिळत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा हा आजार उशिरा निदान होतो आणि उपचार कठीण होतात. याच पार्श्वभूमीवर “एचपीव्ही लसीकरण” हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने आठ मार्चपासून चौदा वर्षे ते पंधरा वर्षाच्या आतील वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण देण्याची मोहीम सुरू केली आहे. हा निर्णय महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि दूरदृष्टीचा आहे. कारण या वयोगटातील मुलींना लस दिल्यास ती भविष्यातील एचपीही संसर्गापासून अधिक प्रभावी संरक्षण देते. जगातील अनेक देशांमध्ये ही लस गेल्या अनेक वर्षांपासून दिली जात आहे. आणि त्यामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
वैद्यकीय संशोधनाने स्पष्टपणे सिद्ध केले आहे की एचपीव्ही लसीमुळे स्त्रीच्या प्रजनन क्षमतेतर कोणताही वाईट परिणान होत नाही. जगभरातील कोट्यवधी मुलींना आणि महिलांना ही लस देण्यात आली असून ती सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे, काही वेळा इंजेक्शनच्या ठिकाणी थोडे दुखने, हलका ताप किंवा थकवा जाणवणे अशी किरकोळ लक्षणे दिसू शकतात परंतु ती अल्पकाळ टिकतात. एचपीव्ही ही लस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात दिली जात आहे. काही लोकांना वाटते की, ही लस फक्त विवाहित महिलांसाठी आहे किंवा ज्याना लैंगिक जीवन सुरु झाले आहे त्यांच्यासाठीच ती आवश्यक आहे. प्रत्यक्षात याच्या उलट आहे. चौदा ते पंधरा वर्षाच्या आतील मुलींना एचपीव्ही लस सर्वाधिक प्रभावी ठरते. ती गर्भाशय मुखाचा संसर्ग होण्यापासून संरक्षण करते.
म्हणूनच ते चौदा -पंधरा वर्षे वयोगटातील मुलींना ही लस देण्याची शिफारस केली जाते. या वयात दिलेले लसीकरण भविष्यातील गर्भाशयमुख कर्करोग आरोग्य समस्यांपासून संरक्षण देऊ शकते. काहीजण असेही मानतात की, स्वच्छता पाळली तर एचपीव्ही संसर्ग होणार नाही. स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैली नक्कीच महत्त्वाची आहे, परंतु एचपीव्ही हा विषाणू असल्यामुळे केवळ स्वच्छता पाळून त्यापासून पूर्ण संरक्षण मिळत नाही. लसीकरण हेच त्याविरुद्धचे सर्वात प्रभावी संरक्षण मानले जाते लसीकरण बरोबरच महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. गर्भाशय मुख तपासणी केल्यास गर्भाशय मुखामध्ये होणारे सुरुवातीचे बदल लवकर ओळखता येतात. त्यामुळे वेळेवर उपचार करणे शक्य होते. आणि कर्करोग होण्याचा धोका कमी करता येतो.
जगातील काही देशांनी एचपीव्ही लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबवली आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलिया देशामध्ये राष्ट्रीय पातळीवर एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम सुरू केल्यानतर तरुण महिलांमध्ये बहुतांश गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दशकांमध्ये हा कर्करोग तिथे अत्यंत दुर्मिळ होण्याची शक्यता आहे. यावरून स्पष्ट होते की, योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय केल्यास हा आजार मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकतो. शाळांमध्ये, ग्रामसभामाध्ये आणि आरोग्य शिबिरांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबद्दल माहिती देणे ही काळाची गरज आहे. एचपीव्ही लसीकरण हे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय येथे लसीकरण बुथचे आयोजन करुन देण्यात येते.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा नियतीने ठरवलेला आजार नाही, योग्य माहिती, योग्य वेळी लसीकरण आणि नियमित तपासणी यांच्या मदतीने हा आजार टाळता येऊ शकतो. प्रत्येक मुलीला सुरक्षित आणि निरोगी भविष्य देण्यासाठी समाजातील गैरसमज दूर करणे आणि वैज्ञानिक माहितीचा प्रसार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार एचपीही लसीकरण करून घेणे हे केवळ वैयक्तिक आरोग्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.
*- डॉ. संजयकुमार पांचाळ,*
*जिल्हा आरोग्य अधिकारी, परभणी*
****


