परभणी ( प्रतिनिधी) स्तनाच्या कर्करोगाबाबत ग्रामीण भागातील महिलांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने या आजाराचे उशिरा निदान होते. त्यामुळे बºयाच वेळा स्तन काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागते किंवा उपचार न झाल्याने रुग्णांचा मृत्यू होतो. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट परभणीने आधुनिक मेमोग्राफी युनिट सुरू केले आहे. या युनिटच्या माध्यमातून आतापर्यंत परभणी शहरासह ग्रामीण भागातील १३५० महिलांनी तपासणी करून घेतली असून अनेकांना लवकर निदान होऊन उपचार सुरू झाले आहेत.
मेमोग्राफी ही स्तनांची विशेष एक्स-रे तपासणी आहे. यात कमी डोसच्या एक्स-रे किरणांचा वापर करून स्तनाच्या ऊतींचे विस्तृत इमेजेस घेतले जातात. या तपासणीद्वारे स्तनातली छोटी गाठ, असामान्य बदल, मायक्रोकॅल्सिफिकेशन किंवा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे सहज ओळखता येतात. ही प्रक्रिया वेदनारहित, सोपी आणि फक्त काही मिनिटे असते. मेमोग्राफी दोन प्रकारची असते स्क्रीनिंग मेमोग्राफी (लक्षणे नसलेल्या महिलांसाठी) आणि डायग्नोस्टिक मेमोग्राफी (लक्षणे असलेल्या महिलांसाठी). भारतात ४० वर्षांवरील महिलांसाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
मेमोग्राफीचा फायदा कसा होतो? : कर्करोगाची लक्षणे दिसण्यापूर्वी २ ते ३ वर्ष आधीच शरीरातील बदल मेमोग्राफीत दिसू शकतात. यामुळे प्राथमिक अवस्थेत आजाराचे निदान होऊन उपचार यशस्वी होण्याची शक्यता ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहते. नियमित स्क्रीनिंगमुळे स्तनाच्या कर्करोगाने होणारा मृत्यूदर २० ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. उशिरा निदान झाल्यास स्तन काढावा लागतो किंवा आक्रमक उपचार (कीमोथेरपी, रेडिएशन) करावे लागतात. लवकर निदान झाल्यास शस्त्रक्रिया साधी राहते आणि स्तन वाचवता येते. प्राथमिक अवस्थेत उपचार सोपे, कमी खर्चाचे आणि रुग्णाला कमी मानसिक-शारीरिक त्रास होतो. मेमोग्राफी ही गोल्ड स्टँडर्ड स्क्रीनिंग पद्धत आहे. ४० वर्षांनंतर दर १ ते २ वर्षांनी तपासणी करणे फायद्याचे ठरते. ज्यांना कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, धूम्रपान किंवा इतर जोखीम घटक असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकर मेमोग्राफी करून घ्यावी. ज्यामुळे लवकर निदान होऊन वेळीच उपचार होऊ शकतात.
आर.पी. हॉस्पिटलचे प्रमुख आ.डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. संप्रियाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. ग्रामीण भागातील गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा मुख्य उद्देश असल्याचे आर.पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगीतले. आ.डॉ.राहुल पाटील यांनी सांगितले, महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हे संपूर्ण समाजासाठी घातक आहे. मेमोग्राफीसारख्या सोप्या आणि प्रभावी तपासणीद्वारे आम्ही स्तन कर्करोग रोखण्याचा आणि लवकर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेपर्यंत ही सुविधा पोहोचवणे हा आमचा मुख्य ध्येय आहे असे त्यांनी सांगीतले.
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


