परभणी, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषद परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.
मतदानासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
तहसीलदार कार्यालय, परभणी येथे जिल्हा परिषद परभणी (सर्व पंचायत समिती सभापतींसह) व शहर महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे १२८ मतदार मतदान करणार आहेत.
तहसीलदार कार्यालय, सेलू येथे नगर परिषद सेलू व नगर परिषद जिंतूरच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ५९ मतदार मतदान करतील.
उपविभागीय अधिकारी कार्यालय, तळ मजला, संजय गांधी विभाग, गंगाखेड येथे नगर परिषद गंगाखेड, नगर पंचायत पालम आणि नगर परिषद पूर्णा येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
तहसीलदार कार्यालय, पाथरी येथे नगर परिषद पाथरी, नगर परिषद मानवत आणि नगर परिषद सोनपेठ येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ७४ मतदार मतदान करतील.
तहसीलदार कार्यालय, हिंगोली येथे नगर परिषद हिंगोली व नगर पंचायत सेनगावच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५८ मतदार आहेत.
तहसीलदार कार्यालय, कळमनुरी येथे नगर परिषद येथे २३ मतदार मतदान करतील. तर तहसीलदार कार्यालय, वसमत येथे नगर परिषद वसमत व नगर पंचायत औंढा नागनाथच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सदर निवडणुकीमध्ये एकूण ४६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी २५३ स्त्री मतदार तर २१३ पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्हा परिषद परभणीचे सर्व सदस्य, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, शहर महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश आहे.
दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी दि. २२ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथील तळमजल्यावरील हॉल क्रमांक १ मध्ये होणार आहे.
*-*-*-*-*


