परभणी(प्रतिनिधी) : रेल्वे सुरक्षा बलाच्या नांदेड विभागाने जून 2026 महिन्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविलेल्या विविध विशेष मोहिमांमधून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. रेल्वे मालमत्तेचे संरक्षण, हरविलेल्या व्यक्ती व मालमत्तेचा शोध, महिला प्रवाशांना सुरक्षा व सहाय्य, तसेच रेल्वे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमांना चांगले यश मिळाले आहे.
रेल्वे सुरक्षा बलाने ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत तीन अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका करून त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले. ‘अमानत’ मोहिमेद्वारे हरविलेल्या मालमत्तेच्या दहा प्रकरणांमध्ये तब्बल 2 लाख 5 हजार 500 रुपयांची मालमत्ता शोधून संबंधित प्रवाशांना परत करण्यात आली. ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत प्रवाशांच्या सामान चोरीच्या 17 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. या कारवाईत 22 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून 1 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपींना शासकीय रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणार्या ‘मेरी सहेली’ उपक्रमांतर्गत जून महिन्यात 1 हजार 997 महिला प्रवाशांना मार्गदर्शन, सुरक्षा आणि आवश्यक सहाय्य पुरविण्यात आले. तर ‘रेल सुरक्षा’ मोहिमेत रेल्वे मालमत्ता चोरीच्या चार गुन्ह्यांमध्ये 11 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून 8 लाख 27 हजार 99 रुपयांची रेल्वे मालमत्ता जप्त करण्यात आली. याशिवाय रेल्वे अधिनियमांतर्गत विविध नियमभंगाच्या 341 प्रकरणांमध्ये 284 जणांविरुद्ध कारवाई करून 32 हजार 535 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जन विश्वास अधिनियमांतर्गत 118 जणांकडून 84 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
परभणीत सामान चोरणार्या टोळीला अटक….
6 जुलै रोजी परभणी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने आणि शासकीय रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत निजामाबाद-काचीगुडा एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान समाधानकारक स्पष्टीकरण न देता आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सायबर तंत्रज्ञानामुळे मोबाईल चोर जेरबंद….
गुंटूर एक्स्प्रेसमधून चोरीस गेलेल्या 15 हजार 999 रुपयांच्या मोबाईलचा सायबर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शोध घेण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे आनंदनगर (परभणी) येथील रोहित शंकर खानपटे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपीला शासकीय रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन..
वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, त्यांच्याकडून खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत तसेच मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा बल, शासकीय रेल्वे पोलीस किंवा रेल्वे कर्मचार्यांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महिला प्रवाशांना कोणतीही अडचण आल्यास ‘मेरी सहेली’ उपक्रमांतर्गत रेल्वे सुरक्षा बलाकडून चोवीस तास मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रेल मदत क्रमांक 139 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


