परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने खेळाडू आयोग (अॅथलीट्स कमिशन) स्थापनेच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. असोसिएशनच्या प्रशासनात खेळाडूंचे प्रभावी आणि अर्थपूर्ण प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे, खेळाडूंच्या हिताचे व कल्याणाचे संरक्षण करणे तसेच पारदर्शकता, उत्तरदायित्व, प्रामाणिकता आणि सुशासनाची तत्त्वे अधिक बळकट करणे हा या आयोगाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अंतर्गत या खेळाडू आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. आयोग स्थापन झाल्यानंतर खेळाडूंना संघटनेच्या प्रशासनात स्वतःचे हित, अधिकार आणि कल्याणाशी संबंधित बाबी प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच खेळ प्रशासनात खेळाडूंचा सक्रिय सहभाग वाढवून क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
या आयोगासाठी जिल्ह्यातील ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत अथवा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे, तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू किंवा वरिष्ठ, कुमार व किशोर गटातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेते अथवा सहभागी झालेले खेळाडू अर्ज करू शकतात. अर्जदार हा किमान एक वर्षापूर्वी खेळातून निवृत्त झालेला असावा. तसेच त्याचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 70 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
पात्र आणि इच्छुक माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंनी दि. 5 ऑगस्ट 2026 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज भरून संघटनेच्या अधिकृत ई-मेल-MangalPande1947gmail.com वर पाठवावा तसेच अर्जाची मूळ प्रत संघटनेच्या सचिवांकडे जमा करावी. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र खेळाडूंची निवड केली जाणार असून, या प्रक्रियेत पुरुष आणि महिला खेळाडूंना समान संधी दिली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अधिकृत सभासदत्व मिळणार असून, सभेतील सर्व अधिकार त्यांना प्राप्त होतील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंनी या उपक्रमात सहभागी होऊन संघटनेचे प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश वरपूडकर आणि सचिव मंगल पांडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संघटनेचे सचिव मंगल पांडे यांच्याशी 9423442999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


