परभणी (प्रतिनिधी) कर्तव्यात कसूर आणि प्रशासकीय अनियमितता प्रकरणी राज्य शासनाने परभणीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आज
१३ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
जिंतूर येथील एका घटनेत गर्भवती महिलेला परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पुरेशा उपचाराअभावी संबंधित गर्भवती महिला आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात कर्तव्य बजावताना नियंत्रणीय व पर्यवेक्षकीय जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पाडल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार डॉ. लखमावार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या कालावधीत डॉ. लखमावार यांचे मुख्यालय उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर मंडळ कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे. निलंबन काळात शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ यांच्यावर प्रशासकीय आणि आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. प्रशासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष करणे, गैरवर्तन करणे तसेच प्रशासकीय व वित्तीय कामकाजात गंभीर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माथुर यांनी दिला होता. या अहवालाच्या आधारे शासनाने डॉ. पांचाळ यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करून महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
निलंबनाच्या कालावधीत डॉ. पांचाळ यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे निश्चित करण्यात आले आहे.
या दोन्ही अधिकाऱ्यांवरील कारवाईमुळे परभणी जिल्ह्यातील प्रशासकीय व आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे….
Saturday, August 15
ताज्या बातम्या:
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार
- शासकीय वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांनो, 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करा
- व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विजय चोरडिया : पत्रकारांच्या प्रश्नांसाठी राज्यभर प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार; परभणीतून अभिनंदनाचा वर्षाव
- कर्जमुक्तीच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक व आधार प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करा – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
- माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत दिले जात आहे स्तनपान प्रशिक्षण


