परभणी (प्रतिनिधी) परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागासाठी अभिमानाची बाब म्हणजे विभागातील अत्याधुनिक मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक प्रयोगशाळेला (Molecular Laboratory) NABL (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories) मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील रुग्णांना राष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळा सेवा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
या प्रयोगशाळेत जीवाणूंची कल्चर व अँटिबायोटिक सेन्सिटिव्हिटी चाचणी, क्षयरोग (TB) निदान, औषध प्रतिकारक क्षयरोग (TB Drug Resistance) तपासणी, कर्करोगाशी संबंधित विविध मॉलिक्युलर चाचण्या, तसेच पूर्वी निदान करणे कठीण असलेल्या अनेक गुंतागुंतीच्या संसर्गजन्य व इतर आजारांचे अचूक निदान आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केले जात आहे. त्यामुळे यापुढे अनेक रुग्णांना पुणे, मुंबई किंवा इतर शहरांमध्ये तपासणीसाठी जाण्याची गरज कमी होणार आहे.
ही प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून प्रशिक्षित व अनुभवी तज्ज्ञ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. NABL मानांकनामुळे प्रयोगशाळेतील सर्व तपासण्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता निकषांनुसार केल्या जाणार असून रुग्णांना अधिक विश्वासार्ह व अचूक अहवाल मिळणार आहेत.
या प्रयोगशाळेच्या उभारणीमागे आर. पी. हॉस्पिटलचे प्रमुख तथा आमदार डॉ. राहुल पाटील यांची दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांचे प्रभावी नेतृत्व व मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्या प्रयत्नांमुळे परभणी जिल्ह्यात अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध होऊ शकली.
या यशाबद्दल आर.पी.हॉस्पिटलचे प्रमुख आ.डॉ.राहुल पाटील अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी डॉ. किरण सगर, डॉ. प्रतिभा माने, डॉ. संतोष हरकळ आणि गुणवंत अहिरे यांचे अभिनंदन केले आहे.


