परभणी, (प्रतिनिधी) — जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज खरीप पिकांची स्थिती, पीकविमा, प्रकल्पातील पाणीसाठा, चारा उपलब्धता तसेच जल जीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अडचणी भासू देऊ नयेत, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. पीकविम्याच्या अनुषंगानेही आवश्यक कार्यवाही वेळेत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी शासन स्तरावर निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते तर उपविभागीय अधिकारी तहसीलदार हे व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.
पालकमंत्री म्हणाल्या की, संभाव्य टंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन टंचाई कृती आराखडा तयार करावा. पाणी व चारा उपलब्धतेचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासन व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जल जीवन मिशनअंतर्गत बंद अथवा दुरुस्ती आवश्यक असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. योजनांची प्रत्यक्ष तपासणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. पाटबंधारे विभागाने मागणीप्रमाणे जायकवाडी, येलदरी प्रकल्पातून पाणी उपलब्ध करुन द्यावे.
दुष्काळसदृश परिस्थितीत प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि शेतकरी व नागरिकांना पाणी, चारा किंवा अन्य कोणत्याही बाबतीत अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.
*पीक वाया गेल्यास मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग घेण्याचे आवाहन*
सर्वसाधारणपणे नियोजित पीक कापणी प्रयोगाचे उत्पादन हे पीक कापणीस तयार झाल्यानंतर नोंदविले जाते. मात्र, अपवादात्मक परिस्थितीमध्ये (उदा. अतिवृष्टी, पूर ,अवर्षण, रोग -किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव यामुळे पीक वाया गेल्यास किंवा नष्ट झाल्यास) शेतकरी सदर पीक मोडून दुसऱ्या पिकासाठी जमीन तयार करणार असतील तर सदर पीक कापणी प्रयोगासाठी जे शेत निवडले असेल त्या शेतामध्ये मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पीक कापणी प्रयोगाचे आयोजन करून वास्तविक उत्पादन नोंदविणे आवश्यक आहे . जर उत्पादन शून्य येत असेल तर ग्रामस्तरीय समिती सदस्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून पीक कापणी प्रयोग घेण्यात यावा. ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर हे प्रयोग घेण्यात येणार आहेत त्यांनी पीक काढणी अगोदर संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी /तलाठी /ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
***


