सेलू,(प्रतिनिधी) : सेलू येथील तालुका क्रीडा संकुलात 26 व 27 सप्टेंबर रोजी झालेल्या 33 व्या मुलांच्या आणि 26 व्या मुलींच्या राज्यस्तरीय सबज्युनिअर आट्यापाट्या स्पर्धेत मुलांच्या गटात बुलढाणा संघाने प्रथम, तर परभणी संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. जळगाव व अमरावती संघ संयुक्तपणे तृतीय ठरले. मुलींच्या गटात अमरावती संघाने प्रथम, परभणीने द्वितीय, तर जळगाव व धाराशिव संघांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला.
नूतन विद्यालय शिक्षण संस्था, परभणी जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन, कावलगाव (ता. पूर्णा) आणि महाराष्ट्र आट्यापाट्या महामंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजतजयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील 16 जिल्ह्यांमधून 250 मुले आणि 250 मुली असे एकूण 500 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. ठाणे, पुणे, वाशिम, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, जळगाव, भंडारा, परभणी, बुलढाणा, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांतील संघांनी सहभाग नोंदविला.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष केशव दुधाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेलूचे गटविकास अधिकारी उदय जाधव, आट्यापाट्या महासंघाचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक कवीश्वर, महाराष्ट्र आट्यापाट्या महासंघाचे राज्य सचिव अमरकांत चकोले, सेलूचे सहाय्यक दुय्यम निबंधक बालाजी मगर, नागपूरचे सहाय्यक दुय्यम निबंधक विवेक क्षीरसागर आणि माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे उपस्थित होते.
स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून प्रवीण महाले, धर्मेंद्र काळे, अंकुश घाटे आणि सुनील पांडे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक परभणी जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे सचिव मधुकर क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले, तर आभार हनुमंत हंबीरे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक गणेश माळवे, योगशिक्षक देविदास सोन्नेकर तसेच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी पुढाकार घेतला.


