परभणी,(प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा २०२६-२७ मध्ये परभणीच्या ओजस्विता राहुल पाटील हिने दमदार कामगिरी करत ६० ते ६३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या विजयामुळे तिची आगामी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ओजस्विता पाटील ही परभणीचे आ.डॉ.राहुल पाटील यांची कन्या आहे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, क्रीडा परिषद परभणी आणि परभणी डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान परभणी डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशनच्या मिशन लक्षवेध बॉक्सिंग सेंटर येथे या विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे २५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत ६० ते ६३ किलो वजनी गटात परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओजस्विता राहुल पाटील हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात विजय मिळविला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या कामगिरीमुळे दि. १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे.
ओजस्विता ही देवगिरी ग्लोबल अकॅडमीमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून, तिला क्रीडा शिक्षिका व राष्ट्रीय खेळाडू कु. मोनाली धनगर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
ओजस्विताच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परभणी डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आ.डॉ. राहुल पाटील,डॉ. संप्रिया राहुल पाटील सचिव धनंजय बनसोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले, क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर सुयेश नाटकर, संजय मुंडे आदींनी तिचे अभिनंदन केले असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


