परभणी,(प्रतिनिधी) : भाचीला विनाकारण बोलू नका असे सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून नागनाथ लांडगे यांच्यावर चाकू व फरशीने जीवघेणा हल्ला करून त्यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी अमित प्रकाश घटमाळ (वय 23, रा. कुर्बान अली शहा नगर, दर्गा रोड, परभणी) यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश-2 व्ही. एस. माने यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणी 27 एप्रिल 2024 रोजी मारोती दिगंबर लांडगे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, घराशेजारी राहणारे अमित प्रकाश घटमाळ व सुमित प्रकाश घटमाळ यांनी भाचीला विनाकारण बोलू नका, असे सांगितल्याचा राग मनात धरून नागनाथ लांडगे यांच्यावर चाकूने पोटात, डाव्या मांडीवर व उजव्या दंडावर, तसेच फरशीने डोक्यावर जीवघेणे वार केले. गंभीर जखमी नागनाथ यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना विघ्नहर्ता हॉस्पिटल, जिंतूर रोड येथे हलविण्यात आले.
या घटनेप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 152/2024 अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम 307, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार यांच्याकडे देण्यात आला. जखमी नागनाथ यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने जबाब नोंदविता आला नाही. उपचारादरम्यान 3 मे 2024 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुन्ह्यात भारतीय दंड विधानाचे कलम 302 वाढविण्यात आले. तपासादरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच मयताचे व आरोपीचे कपडे आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. एम. ननवरे यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटला जिल्हा न्यायाधीश-2 व्ही. एस. माने यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी 14 साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार लता लांडगे व आश्विनी लांडगे यांची तसेच वैद्यकीय अधिकार्याची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अमित घटमाळ यास कलम 302 अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी बाजू मांडली. त्यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. आनंद गिराम व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांनी सहकार्य केले. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, महिला पोलीस हवालदार वंदना आदोडे, कोर्ट पैरवी महिला पोलीस हवालदार रिजवाना शेख व पोलीस हवालदार सचिन धबडगे यांनी काम पाहिले.
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


