विद्यार्थ्यांचा तीन तास ग्रंथवाचनाचा उपक्रम; ‘दानपेटी मंदिरातच का? विद्यामंदिरातही हवी!’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन
परभणी (प्रतिनिधी): नवअक्षर ज्योती प्राथमिक विद्यालय, परभणी येथे मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची गोडी वाढावी आणि समृद्ध वाचनसंस्कृती रुजावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मिठपल्ले डी. सी. होते, तर माजी मुख्याध्यापक श्री. खरात सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. वाघमारे जी. डी. यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तब्बल तीन तास विविध ग्रंथांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी दाखविलेला हा उत्साह उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
याप्रसंगी श्रीमती सदगे एम. पी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक श्री. खरात सर यांनी विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात सखोल मार्गदर्शन करत वाचनाचे महत्त्व, ज्ञानप्राप्ती आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनाची भूमिका याविषयी मोलाचे विचार मांडले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘दानपेटी मंदिरातच का? विद्यामंदिरातही हवी!’ या अभिनव उपक्रमांतर्गत दानपेटीचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी श्री. गडदे डी. जे. सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये दातृत्व, सामाजिक बांधिलकी आणि सहकार्याची भावना रुजविण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
विद्यालयाच्या शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत श्री. अजयजी महाजन सर यांनी विद्यालयास झाड व ट्रीगार्ड भेट दिले. त्यांच्या या सहकार्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. राऊत व्ही. डी. यांनी केले, तर श्रीमती लटपटे ए. डी. यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. तरवटे के. डी. व कु. माने ए. डी. यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाचनातून ज्ञान, ज्ञानातून प्रगती आणि सेवाभावातून सामाजिक बांधिलकी हा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासोबतच सामाजिक जाणीव आणि पर्यावरणप्रेम वाढविण्याच्या दृष्टीने विद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.


