वारसास्थळांचे अचूक दस्तावेजीकरण करा; जागतिक पर्यटनाच्या नकाशावर गावे आणण्यासाठी प्रयत्न करा!
परभणी, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करून त्याचे अचूक व सविस्तर दस्तावेजीकरण करणे ही काळाची गरज आहे. स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन वारसास्थळांचे योग्य नियोजन करावे. या कामासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्त्व विभागाकडून सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मराठी भाषा तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.

डॉ. कुलकर्णी यांनी आज सेलू तालुक्यातील वालूर व हतनूर येथे भेट देऊन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसास्थळांची पाहणी केली. यावेळी वालूर येथील बारव, हतनूर येथील बारव तसेच चालुक्यकालीन हेमाडपंथी मंदिराची पाहणी करून त्यांनी तेथील ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले.

वारसास्थळांच्या जतनासाठी ग्रामस्थांचे कौतुक
हतनूर येथील ग्रामस्थांनी ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे डॉ. कुलकर्णी यांनी विशेष कौतुक केले. गावातील ऐतिहासिक वास्तू, बारव आणि मंदिरांची वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी देश-विदेशातील संशोधक येऊ शकतात. या स्थळांचे महत्त्व योग्य प्रकारे अधोरेखित करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने दस्तावेजीकरण केल्यास वालूर व हतनूर ही गावे भविष्यात जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येण्याची संधी निर्माण होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
हतनूरला ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून विकसित करण्याचा विचार
हतनूर येथे जिल्ह्यातील पहिले ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून नोंद निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबतही डॉ. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. गावाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा जतन करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा. उपलब्ध माहिती, ऐतिहासिक संदर्भ आणि परंपरांचे संकलन करून त्याची अचूक नोंद ठेवावी. ग्रामस्थांनी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास या वारसास्थळांच्या संवर्धनाला निश्चितच गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.
या कामाचा शासनस्तरावर योग्य पाठपुरावा करण्यासाठी संबंधित विभाग सहकार्य करतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी गटविकास अधिकारी उदय जाधव, वारसा समितीचे सदस्य मल्हारीकांत देशमुख, अनिल स्वामी, अनिल बडगुजर, नागेश जोशी, पोलीस पाटील रामचंद्र पारवे, सरपंच महेंद्र गाडे, मंदिर समितीचे सदस्य दत्तराव आंधळे, अॅड. गोविंदराव शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. नागेश्वर मंदिराच्या सभामंडपात डॉ. कुलकर्णी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
*-*-*-*-*-*


