परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरात शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 31 वर्षीय युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील गंगाखेड रोडवरील फरीद कॉलनी परिसरातील बागवान गल्ली येथे 2 नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली.
इरफान खान हबीब खान असे मृत युवकाचे नाव आहे. मोठ्याने शिवीगाळ करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याचदरम्यान आरोपींपैकी एकाने धारदार चाकूने इरफानवर वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने इरफानचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तत्परता दाखवत चारही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय निकुंभ करीत आहेत. संपूर्ण घटना सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली.


