परभणी (प्रतिनिधी) मराठी कवितेच्या प्रांतात नारायण सुर्वे यांचे लेखन म्हणजे श्रमिकांच्या जगण्याचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा बुलंद आवाज आहे. त्यांच्या कवितेतून व्यक्त होणारी ताठ मानेने जगण्याची वृत्ती, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, महात्मा फुले, जाणवणारा प्रभाव आणि जीवनाकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी यामुळे त्यांचे साहित्य इतरांपेक्षा वेगळे ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्य अभ्यासक डॉ. भीमराव खाडे यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणीच्या वतीने कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष श्री. बा. बा. कोटंबे होते.
कवितेतील जीवनानुभव स्पष्ट करताना त्यांनी अनेक कवितांचे संदर्भ दिले. नारायण सुर्वे यांच्या साहित्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले असून त्यांच्या लेखनाचा, विचारांचा आणि कार्याचा अभ्यास आजही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
सुर्वे यांच्या कवितेतील माणूस हा परिस्थितीसमोर झुकणारा नाही, तर संघर्षातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारा आहे. त्यांच्या कवितेतील स्वाभिमान, श्रमप्रतिष्ठा आणि जगण्याची जिद्द आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, मोहन कुलकर्णी, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा. नितीन लोहट, बाळू बुधवंत, बबन आव्हाड, माणिक पुरी, प्रा. हनुमान व्हरगुळे, गंगाधर गायकवाड, अरविंद सगर, तुकाराम खिल्लारे, प्रा. प्रवीण पुरी, प्रा. सिद्धेश्वर जाधव, प्रा. गणेश घनसावंत, किरण पुरी, प्रा. सुरेश शिसोदे, रणजित पुरी, दुर्गादास वळवंटे, माधव गाडे यांच्यासह अनेक साहित्यिक, साहित्यप्रेमी उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. सखाराम कदम यांनी केले, तर राजेंद्र गहाळ यांनी आभार मानले.


