परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १३ हजार ९७२ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर १ हजार ४१ कोटी रुपये जमा
परभणी, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या चौथ्या यादीतील ३४ हजार ७५४ पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर आज ३६८ कोटी ८४ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत चार याद्यांमधून एकूण १ लाख १३ हजार ९७२ पात्र शेतकऱ्यांना १ हजार ४१ कोटी ७५ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे व पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित कर्जांपैकी पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर परभणी जिल्ह्यातील बँकांनी एकूण १ लाख ६० हजार ७६९ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. या माहितीच्या संगणकीय प्रक्रियेनंतर १ लाख ३६ हजार ८०९ पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी चार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या तीन याद्यांमधील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ७९ हजार २१८ पात्र शेतकऱ्यांना ६७२ कोटी ९१ लाख रुपयांची कर्जमाफी वितरित करण्यात आली.. त्यानंतर आज, ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ३४ हजार ७५४ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३६८ कोटी ८४ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
*चार टप्प्यांतील कर्जमाफीचा तपशील पुढीलप्रमाणे :*
१) ७ ऑगस्ट २०२६ – ७ हजार ८७० शेतकरी, ६०.०४ कोटी रुपये.
२) २४ ऑगस्ट २०२६ – ४४ हजार ७१३ शेतकरी, ३४८.०२ कोटी रुपये.
३) १ ऑक्टोबर २०२६ – २६ हजार ६३५ शेतकरी, २६४.८५ कोटी रुपये.
४) ४ नोव्हेंबर २०२६ – ३४ हजार ७५४ शेतकरी, ३६८.८४ कोटी रुपये.
अशा प्रकारे चारही टप्प्यांत मिळून १ लाख १३ हजार ९७२ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर एकूण १ हजार ४१ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विकास जगदाळे यांनी दिली आहे
***


