जिंतूर (प्रतिनिधी) तालुक्यातील केहाळ शेत शिवारात हळदीच्या पिकामध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिंतूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची सात झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांचे एकूण वजन १४ किलो १५० ग्रॅम असून बाजारमूल्य ७ लाख ७ हजार ५०० रुपये आहे.
गुरूवारी(दि. ५) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास केहाळ शिवारातील गट क्रमांक ९८/१ मधील शेतात ही कारवाई करण्यात आली. गोकुळ सुदाम घुगे (वय ३५)रा. केहाळ, ता. जिंतूर याने हळदीच्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाच्या सात झाडांची विनापरवाना लागवड करून जोपासना केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिस उपनिरिक्षक इंगोले व पोलीस हवालदार नसीब पठाण, चौधरी व कांबळे यांनी जायमेस्यावर छापा टाकला. या प्रकरणी पोलीस ठाणे जिंतूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३१/२०२६, एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(ब) व २०(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रेड्डी यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगोले करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महिला सहायक पोलिय निरिक्षक लोकडे यांनी केली.
०००


