परभणी,(प्रतिनिधी) : जिंतूर तालुक्यातील मांडवा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आणि जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह निमित्य शनिवारी (दि.१४) आयोजित दीपोत्सवात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर सहभागी झाल्या. आदिवासी बांधवांसोबत दीपोत्सव साजरा करत त्यांनी त्यांच्या आनंदात सहभाग नोंदविला. यावेळी आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी तरुण डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या शिक्षणाविषयी, अनुभवांविषयी तसेच भविष्यातील वाटचालीविषयी माहिती जाणून घेतली. याशिवाय गावातील महिलांशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्या. शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक विकासाच्या विषयांवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा जनजातीय गौरव दिन हा आदिवासी समाजाच्या संघर्षाचा, योगदानाचा आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान करणारा दिवस आहे. मांडवा येथील दीपोत्सवातून या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडले.
***


