परभणी (प्रतिनिधी) : प्रा. डॉ. सखाराम कदम यांचा ‘समीक्षा विधान’ हा ग्रंथ साहित्यकृतींचे सौंदर्य उलगडणारा असून तो वाचकाला साहित्याचा सखोल आस्वाद घेण्यास प्रवृत्त करतो, असे प्रतिपादन लोकसाहित्याचे संशोधक व अभ्यासक डॉ. साहेब खंदारे यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणीच्या वतीने आयोजित ‘ग्रंथ चर्चा’ या उपक्रमात प्रा. डॉ. सखाराम कदम यांच्या ‘समीक्षा विधान’ या ग्रंथावर विचारमंथन करण्यात आले. वसमत रस्त्यावरील जीवन संस्कार विद्यालयात रविवार 15 नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. खंदारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड येथील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. कीर्तीकुमार मोरे होते.
डॉ. खंदारे पुढे म्हणाले की, साहित्यकृतीतील शब्दांच्या पलीकडचा अर्थ, आशय आणि त्यामागील सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक संदर्भ उलगडण्याचे महत्त्वपूर्ण काम समीक्षक करतात. साहित्यकृतीचे केवळ आशयविश्लेषण न करता तिच्यातील सौंदर्य, कलात्मकता आणि आस्वादमूल्य उलगडणारी समीक्षा महत्त्वाची असते, असे ते म्हणाले.
भारत हा जातीवर आधारित समाजव्यवस्था असलेला देश आहे. त्यामुळे येथे मार्क्सवादापेक्षा आंबेडकरवाद अधिक जवळचा वाटतो. कारण आंबेडकरवाद येथील लोकांच्या विचारविश्वाशी आणि सामाजिक वास्तवाशी जोडलेला आहे, असे नमूद करीत खंदारे यांनी साहित्याची समीक्षा करताना केवळ आशयाचा विचार करून चालत नाही, तर साहित्यकृतीतील सौंदर्य, कलात्मकता आणि आस्वादमूल्यही लक्षात घ्यावे लागते. सौंदर्यदृष्टी जपणारी आणि वाचकाला साहित्यकृतीचा आस्वाद घेण्यास प्रवृत्त करणारी समीक्षा महत्त्वाची असते. साहित्यकृतीचे सुंदर भाष्य करणारी आस्वादक समीक्षा वाचक आणि साहित्य यांच्यातील नाते अधिक समृद्ध करते. जोपर्यंत समीक्षा सर्वव्यापी होणार नाही, तोपर्यंत साहित्याचा प्रसार व्यापक स्तरावर होणार नाही, असे म्हटले.
भाषा, संतसाहित्य, कविता आणि कादंबरी अशा विविध साहित्यप्रकारांवरील समीक्षात्मक लेखनाचा समावेश ‘समीक्षा विधान’ या ग्रंथात करण्यात आला आहे. या ग्रंथातून साहित्याच्या विविध प्रवाहांचा आणि त्यामागील विचारांचा वेध घेण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक पुरी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय भानुदास धोत्रे आणि डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी करून दिला. मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणीचे अध्यक्ष बाबा कोटंबे, राजेंद्र गहाळ आणि डॉ. सुरेश हिवाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी केले, तर डॉ. शरद ठाकर यांनी आभार मानले.
यावेळी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथाकार आसाराम लोमटे यांच्यासह माधव गव्हाणे, विजय ढाकणे, संभाजी रोडगे, प्रवीणकुमार पुरी, हनुमान व्हरगुळे, डॉ. सुरेश हिवाळे, मारुती डोईफोडे, दशरथ डुकरे, भागवत ठोंबरे, ओमकार भालेराव, आदिनाथ भालेराव, प्रा. डॉ. दत्ता शिंदे, डॉ. पंडित निर्मळ, डॉ. दिलीप शृंगारपुतळे, डॉ. केशव खटिंग, गंगाधर गायकवाड, बबन आव्हाड, प्रा. डॉ. रोहिदास नितोंडे, शिवाजी मरगिळ, माधव गाडे आणि किरण पुरी यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.
‘समीक्षा विधान’मधून मूल्यविचारांचा व्यापक आविष्कार…
अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. कीर्तीकुमार मोरे यांनी ‘समीक्षा विधान’ या ग्रंथाच्या आशयाचे आणि मांडणीचे कौतुक केले. हा ग्रंथ अंतर्बाह्य चांगला झाला असून त्याचे चार विभाग आहेत. लेखकाने या ग्रंथातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा स्वीकार केला आहे. कोणत्याही धर्माने सांगितलेले विचार लोक जसेच्या तसे स्वीकारत नाहीत, हे सर्व धर्मांच्या संदर्भात दिसणारे वास्तव आहे. श्रद्धेचा परिघ व्यापक होत गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
समीक्षक हा लेखक आणि वाचक यांच्यातील महत्त्वाचा दुवा..
लेखक प्रा. डॉ. सखाराम कदम यांनी आपल्या लेखनभूमिकेविषयी सांगितले की, सर्जक कलावंत साहित्यकृतीची निर्मिती करतो आणि वाचक तिचे वाचन करतो; मात्र लेखक आणि वाचक यांच्यातील महत्त्वाचा दुवा समीक्षक असतो. शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजून घेऊन साहित्यकृतीचे मर्म उलगडण्याचे काम समीक्षक करतात. ‘समीक्षा विधान’ या ग्रंथातून आपण असाच प्रयत्न केला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने आजवर अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करून लेखन करणार्यांना प्रोत्साहन व बळ देण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले.


